Independence Day 2021: 15 ऑगस्ट रोजी भारत साजरा करणार स्वातंत्र्यदिनाचा 74 वा वर्धापन दिन; राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी
CM Uddhav Thackeray | (File Photo)

भारतीय स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day 2021) 74 वा वर्धापन दिन रविवार दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी साजरा करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्याकरिता ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत शासनाने, 4 जून 2021 अन्वये आदेश पारित केले आहेत. गत वर्षीप्रमाणेच यावर्षीही राज्यात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. हा कार्यक्रम साजरा करताना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी, असे निदेश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात आले आहेत.

राज्यात सर्व विभागीय, जिल्हा, उपविभागीय, तालुका मुख्यालयात तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात यावा. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालय येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी संबंधित पालकमंत्री ध्वजारोहण करतील.

ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी 9.05 वाजता आयोजित करण्यात यावा. या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 वाजेपूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावा.

राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत वाजविण्यात यावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बॅण्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजवावा. यावेळी करण्यात येणाऱ्या भाषणांचा विषय हा स्वातंत्र्यदिनाचे महत्व विषद करणारे तसेच उपस्थितांना देशाची एकता व अखंडता याकरीता कार्य करण्यासाठी प्रेरित करणारे असावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता स्वातंत्र्यदिनाचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर (Social Distancing) संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न होईल, याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांची असेल, आयोजकांनी त्यानुसार मान्यवरांना निमंत्रित करण्याची कार्यवाही करावी. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा. सर्वांसाठी मास्क बंधनकारक आहे. सुरक्षित वावराच्या सर्व नियमाचे काटेकोर पालन करावे व अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाइटद्वारे थेट प्रक्षेपण करावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

या उपक्रमांचे आयोजन केले जाऊ शकेल -

या कार्यक्रमातून व सोशल मीडियाद्वारे ‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणेचा प्रसार करावा. दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे: वृक्षारोपण, आंतर शालेय, आंतर महाविद्यालय स्तरावर ऑनलाईन पध्दतीद्वारे वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा, देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. महत्वाच्या योजनेचा शुभारंभ करावा. सोशल मिडीयाद्वारे निवडक विद्यार्थी, विद्यार्थिनींचे देशभक्तीपर गाणे, भाषणे आयोजित करावीत. शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, एखाद्या विषयाचा वेबिनार आयोजित करावा, एनएसएस व एनवायकेएसद्वारे देशभक्तीपर ऑनलाईन मोहिम राबविण्यात यावी, तसेच सोशल मिडीया व डिजीटल माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मतेसंबंधातील गाण्यांचा प्रचार करावा, संदेश द्यावा, नागरिकांनी घराच्या बाल्कनी, गच्चीवरुन राष्ट्रीय ध्वज हलविणे, याप्रमाणे नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देखील स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक दिनांक 20 मार्च १९९१, 5 डिसेंबर १९९१ आणि 11 मार्च १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याचीही दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वज चांगल्या स्थितीत असल्याची व सुर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी. पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती विभागीय आयुक्त हे त्यांच्या मुख्यालयात ध्वजारोहण समारंभाची व्यवस्था करणार असल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळे कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही. कोकण विभागीय आयुक्त हे कोकण भवन येथील समारंभाची व्यवस्था करतील. मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहणाची कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही.

याप्रमाणे सर्वसाधारण निदेश देण्यात आले असले तरी कोविड-19 सकारात्मक दर (Positivity Rate) विचारात घेऊन संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी आपआपल्या अधिकारक्षेत्रात स्वातंत्र्य दिनाचे महत्व लक्षात घेऊन साजेसा समारंभ साजरा करण्यासंबंधी पालकमंत्री यांच्या सहमतीने आवश्यक ती उचित कार्यवाही करण्यासाठी मुभा देण्यात येत आहे.