Balasaheb Thackeray 95th Birth Anniversary: बाळासाहेब ठकरे जेव्हा शरद पवार यांना म्हणाले 'कमळीची चिंता करु नका'
Bal Thackeray , Sharad Pawar, Supriya Sule | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Balasaheb Thackeray Birth Anniversary:शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 95वी जयंती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेबांबद्दलचा एक किस्सा सांगितला होता. हा किस्सा बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज इथे देत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या राज्यसभा सदस्याच्या रुपात संसदीय पातळीवर राष्ट्रीय राजकारणात उतरणार होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा अर्ज भरण्यापूर्वी आवश्यक तितक्या मतांची जुळवाजुळवही केली होती. तशा बातम्या प्रसारमाध्यमांतून आल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना ही माहिती समजली. त्यानी थेट शरद पवार यांना फोन केला. फोनवर बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचा संवाद झाला तो काहीसा असा होता..

बाळासाहेब ठाकरे: सुप्रिया सुळे राज्यसभेसाठी अर्ज भरतायत खरं काय?

शरद पवार: हो खरंय! युतीचा उमेदवार कोण?

बाळासाहेब: काय बोलता शरदबाबू (बाळासाहेब शरद पवार यांना शरदबाबू म्हणायचे) माझ्या मित्राची मुलगी पहिल्यांदा राज्यसभेवर निघाली आहे आणि मी उमेदवार देऊ? ते शक्य नाही. सुप्रिया राज्यसभेवर बिनविरोध जाईन. शिवसेना उमेदवार देणार नाही'.

शरद पवार: तुमच्या मित्रपक्षाचे (भाजप) काय?

बाळासाहेब: शिवसेना उमेदवार देणार नाही. आणि कमीळीची (भाजप) चिंता तुम्ही सोडा. ते मी बघीन.

हा संवाद प्रत्यक्षात उतरला सुप्रिया सुळे राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेल्या.

बाळासाहेब ठाकरे हे आपल्या भाषणांतून विरोधकांवर अत्यंत तीव्र शब्दांत टीका करत असत. त्यातूनच त्यांची भाषणाची ठाकरी शैली उदयास आली. त्या काळचे काँग्रेस नेते आणि आताचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही ठाकरे यांनी जोरदार प्रहार केले आहेत. शरद पवार यांच्याबाबत ठाकरे यांना नितांत आदर होता. तसेच, त्यांचे व्यक्तिगत पातळीवरचे संबंधही अत्यंत सौहार्दपूर्ण होते. असे असले तरी, जाहीर भाषणांतून मात्र ते त्यांच्यावर अत्यंत शेलक्या भाषेत टीका करत. बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांचा 'बारामतीचा म्हमद्या', 'मैद्याचं पोतं' असा जाहीर भाषणांतून अनेकदा उल्लेख केला आहे. इतकी जहाल टीका करुनही त्यांच्यातील मित्रप्रेमात मात्र कधीच अंतर आले नाही. (हेही वाचा, Balasaheb Thackeray Birth Anniversary: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे पुन्हा एकदा एकाच व्यासपिठावर; शरद पवार, देवेंद्र फडणवीसही राहणार उपस्थित)

एखाद्या व्यक्तिसोबत मैत्री झाली की बाळासाहेब त्या व्यक्तिला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारत. त्याचे कुटुंबीय आपल्या कुटुंबीयांप्रमाणेच मानत. कदाचित म्हणूनच देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालन्यानंतरसुद्धा ठाकरे यांचे दत्त कुटुंबीयांशी सौहादपूर्ण संबंध राहिले. सुनिल दत्त आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांनी सुनिल दत्त (Sunil Dutt) यांचा मुलगा संजय दत्त (Sanjay Dutt) यालाही कधी अव्हेरले नाही. त्याला टाडाखाली अटक झाल्यावर अर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले. तरीसुद्धा बाळासाहेब त्याला तू काळजी करु नकोस. तू लवकरच बाहेर येशील असे सांगत. एका कार्यक्रमात स्वत: संजय दत्तनेही सांगितले की, बाळासाहेब मला संज्या म्हाणायचे. मी अर्थर रोड तुरुंगात अताना त्यांचा मला रोज मेसेज यायचा 'संज्या, फिकर मत कर'. तुरुंगातून बाहेर आल्यावर संजय दत्त याने पहिल्यांदा मुंबई सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर तो थेट बाळासाहेबांना भेटायला 'मातोश्री'वर गेला.