राजस्थानचे निलंबित मंत्री आणि काँग्रेसचे आमदार राजेंद्रसिंह गुढा (Rajendra Singh Gudha)
यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. गुढा हे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे सध्या हा कॉंग्रेस साठी देखील मोठा धक्का आहे. 24 जुलै दिवशी विधानसभेत लाल डायरी झळकवल्यानंतर गुढा यांची विधानसभेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. आज गुढा यांच्या पक्ष प्रवेशासाठी शिंदे स्वतः राजस्थान मधील जयपूरच्या एकदिवसीय दौर्यावर आहेत.
शिवसेनेचे राजस्थानचे प्रभारी चंद्रराज सिंघवी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुढांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत माहिती दिली होती. त्याबाबत त्यांनी ट्वीट देखील केले होते.
#WATCH | Former Rajasthan minister & Congress leader Rajendra Gudha joins Shiv Sena in the presence of Maharashtra CM Eknath Shinde, in Jhujhunu pic.twitter.com/nblgkR7mfO
— ANI (@ANI) September 9, 2023
काय आहे लाल डायरी प्रकरण?
चर्चेत असलेल्या लाल डायरीमध्ये राजस्थानच्या गेहलोत सरकार मधील भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचा दावा केला जातआहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या डायरीचा उल्लेख केला होता. ही डायरी एकेकाळी गेहलोत यांचे जवळचे मानले जाणारे राजेंद्रसिंह गुढा यांच्याकडे असल्याचे बोलले जाते.त्यांनी मंत्री असतानाच स्वतःच्या सरकार वर टीका केल्याने त्यांच्यावर बडतर्फ करण्याची कारवाई झाली.
राजस्थान मधील दौरा आटपून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत. दरम्यान वर्षभरापूर्वी महाविकास आघाडीपासून वेगळं होतं महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर न्यायालयीन घडामोडींमध्ये शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलं आहे. त्यामुळे आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आणि शिंदेंच्या महायुतीच्या सरकार मध्ये पवार गटाची एंट्री झाल्यानंतर शिंदेंनी पक्षविस्ताराला सुरूवात केली असल्याचं म्हटलं जात आहे.