Ola Electric Scooter Recall: आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर ओलाने परत मागवल्या 1,441 इलेक्ट्रिक स्कूटर
Ola Electric Scooter (PC - PTI)

Ola Electric Scooter Recall: वाहनांना आग लागण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ओलाने आपल्या इलेक्ट्रिक दुचाकींचे 1,441 युनिट्स परत मागवले आहे. पुण्यातील 26 मार्चला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी सुरू असल्याचे कंपनीने म्हटले आहे. प्राथमिक मूल्यांकनात ही एक वेगळी घटना असल्याचे आढळले. तथापि, कंपनी त्या बॅचच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची (Ola Electric Scooter) परत तपासणी करण्यास सांगत आहे. तपासणीसाठी कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर परत मागवत आहे.

दरम्यान, 26 मार्च रोजी पुण्यात ओला इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागल्याची घटना घडली होती. पहिल्यांदाच घडलेल्या या घटनेमुळे इलेक्ट्रिक स्कूटरच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच ओला इलेक्ट्रिकने एक निवेदन जारी केले. यापूर्वी अनेक ब्रँडच्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना समोर आल्या होत्या. (हेही वाचा - Battery Explosion: आदल्या दिवशी घेतलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट; कुटुंबातील एकाचा मृत्यू, तर 3 जण जखमी)

ओला इलेक्ट्रिक स्कूटरची होणार तपासणी -

ओला इलेक्ट्रिकने सांगितले की, या स्कूटर्सची आमच्या सेवा अभियंत्यांकडून तपासणी केली जाईल. सर्व बॅटरी सिस्टीम, थर्मल सिस्टीम तसेच प्रोटेक्शन सिस्टीमचे सखोल निदान केले जाईल. ओला इलेक्ट्रिकने सांगितले की, त्यांची बॅटरी सिस्टम आधीपासूनच सुसंगत आहे आणि युरोपियन मानक ECE 136 चे पालन करण्याव्यतिरिक्त भारतासाठी नवीन प्रस्तावित मानक AIS 156 साठी चाचणी केली गेली आहे.

यापूर्वी देशातील विविध भागांत इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. ज्यामुळे निर्मात्यांना त्यांची वाहने परत मागवण्‍यास भाग पाडले जात आहे. ओकिनावा ऑटोटेकने 3,000 पेक्षा जास्त युनिट्स परत मागवल्या होत्या, तर Pure EV ने सुमारे 2,000 युनिट्स परत मागवल्या होत्या.

सरकारने दिला इशारा -

इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटनांनंतर सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक पॅनेल तयार केले होते. यासोबतच सरकारने निष्काळजीपणा करणाऱ्या कंपन्यांना शिक्षेचा इशाराही दिला होता.