नुकतेच 2024 सालातील जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची (World's Most Powerful Passports) यादी समोर आली आहे. ताज्या हेन्ले पासपोर्ट इंडेक्समध्ये (Henley Passport Index) जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत एकूण 6 देशांना पहिले स्थान मिळाले आहे. या देशांमध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेन या देशांची नावे सामील आहेत. या देशांतील नागरिकांना जगातील 194 देशांमध्ये व्हिसा फ्री किंवा व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा आहे.
या यादीत, यंदा भारत 2023 मधील 83 व्या स्थानावरून 3 स्थानांनी वर गेला आहे आणि सध्या तो यादीत 80 व्या स्थानावर आला आहे. शेजारील देश पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर, त्याला 101 वे स्थान मिळाले आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या आकडेवारीच्या आधारे हेन्ली पासपोर्ट इंडेक्स जाहीर करण्यात आला आहे.
या यादीत जपान आणि सिंगापूर गेली 5 वर्षे अव्वल स्थानावर होते, पण यावेळी युरोपने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. या यादीत फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन या देशांनी अव्वल स्थान पटकावले आहे. तर दक्षिण कोरियासह फिनलंड आणि स्वीडनला दुसरे स्थान मिळाले आहे. या देशांचे नागरिक व्हिसाशिवा 193 देशांना भेट देऊ शकतात. ऑस्ट्रिया, डेन्मार्क, आयर्लंड आणि नेदरलँड या देशांना यादीत तिसरे स्थान मिळाले आहे. (हेही वाचा: Reliance Gujarati Company: रिलायन्स कंपनी गुजराती होती, आहे आणि राहील; Vibrant Gujarat Summit 2024 मध्ये मुकेश अंबानी यांचे वक्तव्य)
ब्रिटनला चौथे तर ग्रीस, माल्टा, स्वित्झर्लंडची नावे यादीत पाचव्या स्थानावर आहेत. झेक प्रजासत्ताक, न्यूझीलंड आणि पोलंडच्या पासपोर्टधारकांना एकूण 189 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेशाची सुविधा मिळत आहे. अशा परिस्थितीत या देशांचा पासपोर्ट जगातील सहाव्या क्रमांकाचा शक्तिशाली पासपोर्ट आहे. तर महासत्ता अमेरिका आणि कॅनडाला सातवे स्थान मिळाले आहे. या देशांचे नागरिक व्हिसाशिवाय 188 देशांना भेट देऊ शकतात. या यादीत अफगाणिस्तानला सर्वात खालचे स्थान मिळाले आहे, ज्याचे नागरिक 28 देशांमध्ये व्हिसाशिवाय भेट देऊ शकतात. येमेनला 100 वे स्थान मिळाले आहे. या यादीत चीनला 62 वे स्थान मिळाले आहे. भारताबरोबरच उझबेकिस्तानलाही 80 वे स्थान मिळाले आहे.