टोमॅटोच्या दरात (Tomato Price) वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना (Farmers) होत आहे. मात्र, दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला वाढत्या दराचा फटका बसत आहे. दिल्लीत सध्या टोमॅटोचे दर हे 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. टोमॅटोचे भाव आधीच गगनाला भिडले आहेत, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने काही शहरांमध्ये सवलतीच्या दरात टोमॅटोची विक्री सुरू केली आहे. असे असले तरीदेखील दरात वाढ होताना दिसत आहे.  देशातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळं वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर दुसरीकडे पिकाचं मोठं नकसान झालं आहे. त्यामुळं टोमॅटोच्या दरात मोठी वाढ होत आहे.  (हेही वाचा - Kerala: चहाची टपरी चालवणाऱ्या आजीने केली वायनाड भूस्खलनग्रस्तांसाठी आयुष्यभराची सर्व कमाई दान)

हिमाचल प्रदेशातील पावसामुळं राष्ट्रीय राजधानी दिल्लीत टोमॅटोचे किरकोळ भाव पुन्हा एकदा 100 रुपये प्रतिकिलोच्या आसपास आहेत. दिल्लीत टोमॅटोच्या दराने यंदाच्या हंगामात एकदा शंभरी गाठली आहे. गेल्या महिन्यात दिल्लीच्या किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 100 रुपये ते 120 रुपये किलोवर पोहोचले होते.  सफाल आउटलेट्स व्यतिरिक्त असंघटित किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 100 ते 120 रुपये किलोपर्यंत पोहोचले होते.

टोमॅटोचे दर कमी करण्यासाठी सरकारने NCCF सारख्या सहकारी संस्थांच्या मदतीने दिल्लीत अनेक ठिकाणी अनुदानित दरात टोमॅटो उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली आहे. सध्या दिल्लीत टोमॅटोचे किरकोळ दर 70 रुपये प्रति किलोच्या आसपास आहेत, तर आर्थिक राजधानी मुंबईत किरकोळ किंमत 80 रुपये प्रति किलो आहे. नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) दिल्लीतील अनेक ठिकाणी टोमॅटो 60 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने विकत आहे. गतवर्षी परिस्थिती खूपच बिकट झाली होती, किरकोळ बाजारात टोमॅटोचा भाव 350 रुपये किलोवर पोहोचला होता.