Mumbai FDA Action: हायजीन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शालिमार, नूर मोहम्मदी आणि रेहमानिया रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेल्सचे परवाने निलंबित केले असून अमरावतीमधील एका आस्थापनेला टाळे ठोकले आहे.

Mumbai FDA Action: हायजीन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शालिमार, नूर मोहम्मदी आणि रेहमानिया रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेल्सचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये भेंडी बाजारातील प्रसिद्ध शालिमार हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड, नूर मोहम्मदी हॉटेल आणि उमरखाडी येथील रेहमानिया रेस्टॉरंटचा समावेश आहे. अन्न सुरक्षा आणि मानके नियमावली २०११ अंतर्गत १३ जुलै रोजी घेण्यात आलेल्या धडक तपासणी मोहिमेनंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय अमरावती येथील 'अमरावती दरबार' हे हॉटेल वैध परवान्याशिवाय चालवले जात असल्याचे आढळल्याने ते तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शालिमार रेस्टॉरंटवर २५ त्रुटींमुळे कारवाई

Shalimar Restaurant: मुंबईतील प्रसिद्ध शालिमार रेस्टॉरंटला एफडीएने यापूर्वी एप्रिल महिन्यात सुधारणा नोटीस बजावली होती. मात्र, १३ जुलै रोजी झालेल्या पुनर्तपासणीत या हॉटेलमध्ये २५ मोठ्या त्रुटी तशाच राहिल्याचे समोर आले. स्वयंपाकघरातील ओले व निसरडे मजले, कच्च्या मालाची नोंद नसणे, पिण्याचे पाणी आणि खाद्यतेलाच्या चाचणी अहभावाचा अभाव, तसेच शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थ योग्य प्रकारे वेगळे न ठेवणे अशा अनेक गंभीर बाबी आढळल्या. खिडक्यांना कीटक प्रतिबंधक जाळ्या नसल्याचेही तपासणीत समोर आले. यामुळे १४ जुलै रोजी या रेस्टॉरंटचा परवाना निलंबित करण्यात आला.

नूर मोहम्मदी हॉटेलमध्ये स्वच्छतेचा अभाव

Noor Mohammadi: भेंडी बाजारातील ऐतिहासिक नूर मोहम्मदी हॉटेलच्या स्वयंपाकघरात आणि अन्न हाताळणीच्या जागेत स्वच्छतेच्या नियमांचे मोठे उल्लंघन झाल्याचे एफडीएला आढळले. स्वयंपाकघराच्या जमिनीवर जळालेल्या तेलाचे जाड थर साचले होते, भिंती आणि छतावर ग्रीस जमा झाले होते, तसेच जुनी व अस्वच्छ भांडी वापरली जात होती. पाणी चाचणी आणि पुरवठादारांच्या नोंदी येथे ठेवल्या नव्हत्या. सर्वात गंभीर म्हणजे, कबाब सेक्शनजवळील उघड्या खिडक्यांमुळे स्वयंपाकघरात माश्या, कीटक आणि कावळ्यांचा वावर असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे या हॉटेलचा परवानाही निलंबित करण्यात आला.

उमरखाडी येथील रेहमानिया रेस्टॉरंट बंद

उमरखाडी परिसरातील रेहमानिया रेस्टॉरंटमध्ये अन्नपदार्थ, रसायने आणि पॅकेजिंग साहित्याची साठवणूक अयोग्य पद्धतीने केली जात असल्याचे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. हॉटेलमधील उपकरणांना गंज चढला होता, भिंतींचे प्लास्टर निघाले होते आणि दारे कीटकांना आमंत्रण देणारी होती. आवश्यक त्या पाणी व अन्न चाचण्यांचे कोणतेही रेकॉर्ड रेस्टॉरंटकडे उपलब्ध नव्हते. सुरक्षेचा उपाय म्हणून या हॉटेलचे कामकाज तातडीने थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अमरावतीमधील हॉटेलवरही कारवाई आणि राज्यव्यापी मोहीम

मुंबईबाहेर अमरावती येथील 'अमरावती दरबार' या हॉटेलवर एफडीएने मोठी कारवाई केली आहे. हे हॉटेल वैध अन्न परवान्याशिवाय (Food Licence) चालवले जात होते. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे सांगत प्रशासनाने हे हॉटेल तात्काळ बंद करण्याची नोटीस बजावली आहे.

एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात एकूण ३२ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत एकूण आठ आस्थापनांना सुधारणा नोटिसा जारी करण्यात आल्या असून, नियम धाब्यावर बसवणाऱ्या चार हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध ही कडक कारवाई यापुढेही सुरूच राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 15, 2026 07:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).