प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) पुन्हा एकदा बलात्कारा (Rape) संबंधी एक धक्कादायक घटना घडली आहे. घरात घुसून 13 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची गोष्ट समोर येत आहे, त्यानंतर या मुलीला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला गेला. मुलीने विरोध केल्यावर तिच्या डोक्यावर आणि शरीराच्या इतर भागावर कात्रीने हल्ला करण्यात आला आहे. सध्या या मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांनीही या प्रकरणाचा निषेध केला आहे. आता सीएम केजरीवाल यांनी एम्स रुग्णालयात जाऊन पीडित मुलीची भेट घेतली आहे. दिल्लीच्या पीरागढ़ी परिसरात ही घटना घडली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 13 वर्षाची मुलगी जेव्हा घरात एकटी होती, तेव्हा दोन लोक तिच्या घरात घुसले आणि तिच्यावर बलात्कारानंतर तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केल्यावर तिच्या डोक्यावर आणि शरीराच्या इतर भागावर कात्रीने हल्ला केला आणि तेथून पळून गेले. पीडित मुलीला गंभीर स्थितीमध्ये एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी खुनाचा प्रयत्न आणि पोक्सो यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, त्यांनी आरोपीच्या शोधात संभाव्य लक्ष्यांवर छापेमारी सुरू केली आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी याबाबत ट्विट केले. त्यांनी लिहिले आहे की, ‘13 वर्षाच्या मुलीशी झालेल्या हिंसक घटनेच्या बातमीने हृदय पिळवटून गेले आहे. अशा गुन्हेगारांचे बाहेर मोकाट फिरणे हे सहनशक्तीच्या पलीकडील आहे. मी पीडितेची स्थिती जाणून घेण्यासाठी थोड्या वेळात एम्स येथे जात आहे.’ (हेही वाचा: औरंगाबाद येथे 20 वर्षीय मुलाकडून आईवर वारंवार बलात्कार; तीन महिने चालला होता लैंगिक अत्याचार)

अरविंद केजरीवाल ट्वीट -

त्यानंतर सीएम केजरीवाल यांनी पिडीत कुटुंबाची भेट घेतली. सरकारने कुटुंबाला 10 लाखाची मदत जाहीर केली आहे. याबाबत केजरीवाल म्हणतात. 'मी पोलिस आयुक्तांशी बोललो आहे. पोलिस आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. आरोपींना कठोर शिक्षा करण्याची सरकारची तरतूद आहे. सरकार तिच्या कुटुंबातील सदस्यांना 10 लाख रुपयांची मदत करेल.'

दरम्यान, पीडित मुलगी मूळची बिहारची आहे. ती आपल्या कुटुंबियांसह पीरागढीतील भाड्याच्या घरात राहते. पीडितेच्या कुटुंबात तिचे आईवडील आणि मोठी बहीण असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे तिघेही बाहेर कामाला जात असल्याने बऱ्याच वेळा मुलगी घरी एकटीच असते. ही मुलगी जिथे राहते तिथे जवळपास 25 खोल्या आहेत ज्यात भाडेकरू राहतात.