Arrest | (Representative Image)

Police Action On Satta Matka: भुज सायबर क्राईमने महादेव बेटिंग ॲपशी संबंधित एक मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सट्टेबाजीचे जाळे उघड केले आहे. प्राथमिक तपासात या नेटवर्कद्वारे एका वर्षात 5,200 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. पाटण आणि दुबई येथून हा सट्टा चालवला जात होता. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला गुजरातच्या पाटण येथून अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 1 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ऑनलाइन क्रिकेट बेटिंगचे नेटवर्क चालविणारा हा आरोपी पाटण येथे आला असल्याची माहिती भुज सायबर क्राईमला मिळाली होती. या माहितीच्या आधारे भुज सायबर क्राईम पथकाने पाटण येथून भरत चौधरी नावाच्या व्यक्तीला अटक केली. भरत हा महादेव ॲपचा डेव्हलपर आहे.

हे प्रकरण एवढ्या मोठ्या नेटवर्कशी जोडलेले असल्याचे सुरुवातीला पोलिसांच्याही लक्षात आले नाही. आरोपीच्या प्राथमिक चौकशीदरम्यान त्याचा फोन तपासला असता पोलिसांना धक्काच बसला. तपासादरम्यान हे नेटवर्क 1 कोटी किंवा 2 कोटी रुपयांचे नसून तब्बल 5,200 कोटी रुपयांचे असल्याचे आढळून आले. आरोपी भरतने त्याच्या साथीदारांसह एका वर्षात सट्टेबाजीतून इतक्या जास्त रुपयांची उलाढाल केली होती.

पहा पोस्ट- 

देशात महादेव ॲपद्वारे ऑनलाइन सट्टेबाजीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अनेक राज्यांमध्ये सट्टेबाजी करणाऱ्या टोळ्यांचा दररोज पर्दाफाश होत आहे. गुजरातमध्येही महादेव ॲपच्या माध्यमातून सट्टेबाज टोळ्या सक्रिय असून त्यांच्यावर पोलीस सातत्याने कारवाई करत आहेत. आता वृत्तानुसार, महादेव ॲपचा डेव्हलपर भरत चौधरी याला कच्छ बॉर्डर रेंज पोलिसांनी अटक केली. तो महादेव बेटिंग ॲपचा भागीदार आहे. दुबईहून गुजरातमधील पाटण येथे पोहोचल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांना आरोपीच्या मोबाईलमध्ये बेटिंगसाठी 23 आयडी सापडले आहेत. (हेही वाचा: Bihar Fraud: सट्टा, मटका, कल्याण मटका म्हणजे काय; पैजेचा हा खेळ कसा असतो?)

भरत चौधरी हा पाटण जिल्ह्यातील राधनपूर तालुक्यातील कमालपूर गावचा रहिवासी आहे. या प्रकरणात अन्य अनेक आरोपींचाही सहभाग असल्याचे समजते. या प्रकरणी भुज सायबर सेल टीमने आरोपी दिलीप प्रजापती, अतुल अग्रवाल, सौरभ चंद्राकर, सिंह रविकुमार, रोनक प्रजापती यांच्याविरुद्ध पाटण बी डिव्हिजन पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे.