Monsoon 2021: अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक; यंदा संपूर्ण देशात मान्सून सामान्य राहण्याचा IMD चा अंदाज, 98 टक्के पडेल पाऊस
Monsoon Update (Photo Credits: Pixabay)

भारतीय हवामान खात्याने (IMD) आज देशासाठी मान्सूनचा (Monsoon 2021) पहिला अंदाज जाहीर केला असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की यंदा संपूर्ण देशात मान्सून सामान्य राहणार आहे. देशात यावर्षी 98 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर ही संस्था मे महिन्यात पुढील अपडेट देईल. एवढेच नव्हे तर संस्था दर महिन्याच्या शेवटी पावसाचा अंदाज जारी करणार आहे. 96 ते 104 टक्क्याच्या दरम्यानचा पाऊस सामान्य मॉन्सून म्हणून समजला जातो. याआधी स्कायमेटनेही मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र, स्कायमेटचा अंदाज होता की, सरासरी 103% पाऊस पडेल.

आयएमडीने म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांपैकी मागील दोन वर्षांपासून मान्सून सरासरी आहे. यावेळी कोविडच्या दुसर्‍या लाटेमुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन व विविध निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मान्सूनबाबतची बातमी सकारात्मक आहे. हवामान खात्याने सांगितले की, त्यांच्या अभ्यासानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात पाऊस 96 टक्के ते 98 टक्क्यांपर्यंत असू शकतो. यापूर्वी 1996, 1991 आणि 1998 मध्ये मान्सून सलग तीन वर्षे सामान्य होता. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा 2019, 2020 आणि 2021 साली सलग तीन वर्षे चांगला पाऊस पडणे ही अर्थव्यवस्थेसाठी चांगली चिन्हे आहेत.

आयएमडीने सांगितले की पावसाळ्यात ला निनोची (La Nino) संभाव्यता बर्‍यापैकी कमी आहे. पॅसिफिक महासागरातील पेरूजवळ समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानवाढीच्या घटनेस अल निनो असे म्हणतात. गेल्या काही वर्षांपासून पॅसिफिक महासागराचे पृष्ठभाग तापमान वाढत आहे. अल निनोमुळे समुद्री हवेचा मार्ग बदलतो,  त्यामुळे अतिवृष्टी होत असलेल्या भागात पाऊस पडत नाही आणि उलट ज्या भागात पाऊस पडत नाही तेथे मुसळधार पाऊस पडतो.

दरम्यान, भारतात एकूण पर्जन्यमानाच्या जवळपास 80 टक्के पाऊस हा पावसाळ्यामध्ये होतो. हा सहसा जूनच्या शेवटी सुरू होते आणि सप्टेंबरपर्यंत चालू असतो. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मान्सून खूप महत्वाचा आहे. भारतामध्ये शेती पूर्णपणे पावसाळ्यावर अवलंबून असते. अशा परिस्थितीत चांगला पाऊस म्हणजे जास्त उत्पादन आणि जास्त उत्पादन म्हणजे ग्रामीण उत्पन्नात सुधारणा. चांगला मान्सून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लावतो.