Maharashtra Board HSC Result 2026 Date: एप्रिलअखेर निकाल जाहीर होणार नाही; पाहा ताज्या अपडेट्स
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE) इयत्ता १२ वीचा निकाल एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, निकालासाठी विद्यार्थ्यांना मे महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) इयत्ता १२ वीच्या (HSC) निकालाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही एप्रिल महिन्याच्या शेवटी निकाल लागेल, अशी चर्चा विद्यार्थी आणि पालकांमध्ये होती. मात्र, बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलअखेर निकाल जाहीर होण्याची शक्यता मावळली आहे. उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनानंतरची तांत्रिक कामे अद्याप प्रक्रियेत असल्याने निकालासाठी मे महिन्याचा दुसरा किंवा तिसरा आठवडा उजाडण्याची चिन्हे आहेत.
निकालाच्या प्रक्रियेत विलंब का?
बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च दरम्यान पार पडल्या होत्या. परीक्षेचा निकाल वेळेत लावण्यासाठी बोर्डाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तरीही, लाखो विद्यार्थ्यांच्या गुणांचे संकलन, संगणकीकरण आणि त्यांची फेरपळताळणी करण्यासाठी ठराविक वेळ लागतो. सध्या ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असली, तरी एप्रिलच्या उर्वरित दोन-तीन दिवसांत निकाल लावणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मे महिन्यात निकाल लागण्याची शक्यता
गेल्या काही वर्षांचा कल पाहता, महाराष्ट्र बोर्डाचा १२ वीचा निकाल साधारणपणे २० मे च्या आसपास जाहीर केला जातो. यंदाही बोर्डाने निकालासाठी कोणतीही अधिकृत तारीख अद्याप निश्चित केलेली नाही. निकाल जाहीर होण्यापूर्वी किमान एक ते दोन दिवस आधी बोर्डाकडून अधिकृत परिपत्रक काढून निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थी आणि पालकांना सूचना
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तो बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. सध्या सोशल मीडियावर निकालाच्या तारखांबाबत अनेक मेसेज व्हायरल होत आहेत, मात्र त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. अधिकृत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी बोर्डाच्या mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच पदवी प्रवेशाची प्रक्रिया (उदा. इंजिनिअरिंग, मेडिकल आणि आर्ट्स, कॉमर्स, सायन्स पदवी) सुरू होते. निकालाला होणाऱ्या थोड्या विलंबामुळे प्रवेश प्रक्रियेवर मोठा परिणाम होणार नाही, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले आहे. सीईटी (CET) आणि इतर प्रवेश परीक्षांचे नियोजन निकालाच्या संभाव्य तारखा लक्षात घेऊनच करण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 28, 2026 02:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

