
कोरोना विषाणू महामारीनंतर ज्या वेगाने मार्केट सुरु झाले त्याच वेगाने तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या. गेल्या वर्षभरात अनेक मोठ-मोठ्या कंपन्यांनी आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. अशात देशातही बेरोजगारीची (Unemployment) समस्या भेडसावत आहे. आता हीच गोष्ट अधोरेखित करणारे एक मोठे उदाहरण समोर आले आहे. बंगळुरूमधील (Bengaluru) स्टार्टअप संस्थापक आणि सीईओ यांना कायमस्वरूपी दूरस्थ नोकरीसाठी (Work From Home) 48 तासांच्या आत 3000 पेक्षा जास्त रेझ्युमे प्राप्त झाले आहेत. एवढ्या कमी कालावधीत कंपनीच्या वेबसाइटवर एवढ्या मोठ्या संख्येने रिझ्युमे दिसल्याने त्यांनाही आश्चर्य वाटले आहे.
सीईओ कार्तिक मांडविल यांनी आपला अनुभव ट्विटरवर लोकांसोबत शेअर केला आहे. ते लिहितात, ‘आमच्या कंपनीच्या वेबसाइटला गेल्या 48 तासांत 3000 हून अधिक रिझ्युमे प्राप्त झाले आहेत, जॉब मार्केट इतके खराब आहे का?’ इतकेच नाही तर महिनाभरात सुमारे 13000 लोकांनी या नोकरीसाठी अर्ज केले आहेत.
कार्तिक यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, त्यांची या नोकरीच्या पोस्टिंगबाबत इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर प्रमोशन केले नव्हते. नोकरीशी संबंधित सर्व माहिती केवळ कंपनीच्या वेबसाइटवरच टाकण्यात आली होती. आता खुद्द सीईओ देखील आश्चर्यचकित आहेत की, इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर आपल्याकडे रिक्त जागा असल्याची माहिती शेअर न करताही या जागांसाठी वेबसाईटवर इतक्या लोकांनी अर्ज केले आहेत. (हेही वाचा: MMRCL Recruitment 2023: मुंबई मेट्रोमध्ये काम करण्याची उत्तम संधी: mmrcl.com वर व्यवस्थापकीय आणि इतर पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू)
Received over 3K resumes in the last 48 hours just on our website - how bad is the job market?
— Kartik Mandaville (@kar2905) July 16, 2023
वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला, Permanently Remote च्या पर्यायावर Product, Founder Office, Software Development Engineer शी संबंधित प्रोफाइल दिसेल. ही पदे रिमोट जॉब किंवा वर्क फ्रॉम होमसाठी असल्याने यासाठी इतक्या संख्येने आर्ज आले होते. कार्तिकहे स्प्रिंगवर्क्सचे सीईओ आहेत, जे मानव संसाधन क्षेत्रासाठी सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रदान करते. कंपनीची स्थापना 2014 मध्ये झाली. स्प्रिंगवर्क्स वेबसाइटनुसार, कार्तिक यांनी यूएसमधील कार्नेगी मेलॉन विद्यापीठातून मशीन लर्निंगमध्ये मास्टर्स केले आहे. माहितीनुसार त्यांनी वयाच्या 6 व्या वर्षी कोडिंग सुरू केले.