'हिंदूंनी 4 मुले जन्माला घालावीत, त्यातील दोन VHP-RSS ला सुपूर्त करावीत'; Sadhvi Rithambara यांचे वादग्रस्त वक्त्यव्य

याआधी गाझियाबादमधील डासना मंदिराचे महंत यती नरसिंहानंद यांनीही हिंदूंना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले होते

'हिंदूंनी 4 मुले जन्माला घालावीत, त्यातील दोन VHP-RSS ला सुपूर्त करावीत'; Sadhvi Rithambara यांचे वादग्रस्त वक्त्यव्य
Sadhvi Rithambara (संग्रहित संपादित प्रतिमा)

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) रामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत सामाजिक वातावरण तणावपूर्ण राहिले. राज्यामधील अजान वाद आणि त्यानंतर हनुमान जयंती मिरवणुकीतील हाणामारीमुळे राज्यात जातीय सलोखा दुखावला गेला आहे. दरम्यान, राम महोत्सव नावाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या साध्वी ऋतंभरा (Sadhvi Rithambara) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी हिंदूंना एक-दोन नव्हे तर चार मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले. राज्यातील कानपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेतर्फे रामोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी साध्वी ऋतंभरा आल्या होत्या.

कार्यक्रमाला संबोधित करताना त्या म्हणाल्या की, प्रत्येक हिंदूने दोन मुलांच्या विचारातून बाहेर आले पाहिजे. प्रत्येक हिंदूला आता चार मुले झाली पाहिजेत. यातील दोन मुले कुटुंबासाठी आणि उरलेली दोन मुले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि विश्व हिंदू परिषद (VHP) यांच्याकडे सोपवली जावी, जेणेकरून ते राष्ट्रीय बलिदानात योगदान देऊ शकतील. त्या पुढे म्हणाल्या की, आपल्यासाठी राष्ट्र हेच सर्वकाही असले पाहिजे.

यासोबतच साध्वी म्हणाल्या, 'रामोत्सवात हजारो श्रीराम रूपांची पूजा करण्यात आली. या सुंदर प्रसंगी रामाचे भक्त असणे हे एक सौभाग्य आहे. रामभक्त होण्यासाठी रामत्व आत्मसात करावे लागते, कारण राम हे अपराजित पौरुषाचे प्रतीक आहे.’ त्या पुढे म्हणाल्या की, देशातील राजकीय पक्षांनी हिंदूंमध्ये फूट पाडली पण श्रीरामाचे आचरण संपूर्ण समाजाला एकत्र आणेल.

त्याचवेळी या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी कथित लव्ह जिहादच्या प्रकरणांचा संदर्भ देताना सांगितले की, 'एकेकाळी सीता मातेच्या अपहरणामुळे रावणाचा संपूर्ण नाश झाला होता, आता आजही लव्ह जिहाद करणार्‍यांचा समूळ नायनाट करायचा आहे, फक्त रामाची पूजा करून काही होणार नाही.’ (हेही वाचा: जहांगीरपुरी हिंसाचारावर AIMIM प्रमुख ओवेसी यांचे ट्विट - न्यायाशिवाय बंधुभाव शक्य नाही)

दरम्यान, याआधी गाझियाबादमधील डासना मंदिराचे महंत यती नरसिंहानंद यांनीही हिंदूंना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले होते. हिमाचलमधील एका कार्यक्रमात बोलताना जामिनावर बाहेर असलेले नरसिंहानंद म्हणाले की, भारताला इस्लामिक देश होण्यापासून रोखायचे असेल तर हिंदूंनी अधिकाधिक मुले निर्माण केली पाहिजेत.

(The above story first appeared on LatestLY on Apr 18, 2022 07:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).