Cyclone Representative (Photo Credits: ANI)

भारताच्या मागे लागलेली संकटांची मालिका काही संपण्याची चिन्हे दिसत नाही आहे. एकीकडे देश कोरोना सारख्या विषाणू विरुद्ध मोठा लढा देत आहे. तर आता देशापुढे एक नवं संकट उभं ठाकलय. 'अम्फान' (Amphan) चक्रीवादळ असे या संकटाचे नाव असून येत्या 12 तासांत हे संकट भारताच्या काही भागात धडकणार आहे. दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे येत्या 12 तासांत पश्चिम बंगाल, ओडिशाच्या काही जिल्ह्यांमध्ये अम्फान चक्रीवादळ धडकण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे या भागात राहणा-या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या अम्फान चक्रीवादळामुळे निर्माण होणा-या आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व उपाययोजना सुरु असून या भागातील सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत अग्निशमन, NDRF, स्थानिक पोलीस सर्वांना सूचना दिल्या आहेत. तसेच येथील नागरिकांना देखील योग्य ती खबरदारी घेण्यास सांगितली आहे. पुरेसा अन्नसाठा, पाण्याची सोय करण्यात आली आहे. थोडक्यात बचावकार्याची पूर्वतयारी देखील सुरु आहे.

देशाला चक्रीवादळाचा धोका; 'या' भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याने दिला इशारा

या चक्रीवादळामुळे दिल्ली, एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, पश्चिम बंगाल, सिक्किम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, उत्तर ओडिशा, अंदमान आणि निकोबार, जम्मू-काश्मीर, लडाख , राजस्थान, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने मच्छीमारांना 15 मेपासून दक्षिण आणि मध्य बंगालच्या उपसागरामध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. या भागात समुद्राकिनारी राहणाऱ्या लोकांनाही दूर जाण्यास सांगितले आहे.