देशाची राजधानी दिल्लीत महिलांबाबतची वाढती गुन्हेगारी ही चिंतेची बाब असतानाच, एक अहवाल (NCRB Report) समोर आला आहे, त्यामुळे ही चिंता आणखी वाढली आहे. दिल्ली हे महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर ठरले आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. अहवालानुसार, 2021 मध्ये दिल्लीत महिलांविरोधातील 13,982 गुन्ह्यांची नोंद झाली आहे, तर देशातील एकूण 19 महानगरांमध्ये 43,414 महिलांविरोधातील गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दिल्लीनंतर मुंबईत महिलांबाबत सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. बंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महानगरांमध्ये दिल्लीत सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. 2020 मध्ये दिल्लीत महिलांविरोधातील 9,782 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 2021 मध्ये नोंदवलेली प्रकरणे 2020 मध्ये नोंदवलेल्या प्रकरणांपेक्षा 40 टक्के जास्त आहेत. ही भीतीदायक गोष्ट आहे आणि त्याचवेळी महिलांच्या सुरक्षेबाबतचे सरकारचे मोठे दावे यामुळे उघड होत आहेत. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये दिल्लीतील सायबर गुन्ह्यांमध्ये 111 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2021 मध्ये सायबर क्राईमचे 356 गुन्हे दाखल झाले.
अहवालानुसार, 2021 मध्ये दिल्लीत दररोज दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाला. दिल्लीत बलात्कार, अपहरण आणि महिलांवरील क्रूरतेच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2021 मध्ये दिल्लीत अपहरणाचे 3,948, पतीकडून छळाचे 4,674 आणि मुलींवर बलात्काराचे 833 गुन्हे दाखल झाले. 2021 मध्ये दिल्लीत हुंडाबळी मृत्यूची 136 प्रकरणे नोंदवली गेली, जी 19 महानगरांमधील एकूण मृत्यूच्या 36.26 टक्के असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. (हेही वाचा: धक्कादायक! हैद्राबादमध्ये शिबिरात केलेल्या नसबंदीनंतर 4 महिलांचा मृत्यू)
2012 च्या निर्भया घटनेने संपूर्ण देश हादरला होता. यानंतर राजधानी दिल्लीत महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली. असे असतानाही त्यांच्यावरील गुन्ह्यांच्या घटना कमी होत नाहीत. येथे गुन्हेगारांचा वावर सातत्याने वाढत आहे.