Underwater train (Photo Credits: Indian Railways)

मेट्रोने पाण्याखालून प्रवास करण्याचे लोकांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन (KMRC) ने, आपल्या पूर्व-पश्चिम प्रकल्पांतर्गत (East-West Corridor) अंडरवॉटर मेट्रो (Underwater Metro) बोगदा तयार केला आहे. आज, 13 फेब्रुवारी 2020 रोजी, कोलकाता (Kolkata) म्हणजेच 'जॉय ऑफ सिटी' शहरात देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. कोलकातामध्ये हुगली नदीखाली तयार करण्यात आलेला हा बोगदा कोलकाताला हावडाशी जोडेल.

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते या देशातील सर्वात स्वस्त मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर उद्या, 14 फेब्रुवारीपासून ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होईल. या मेट्रोचा एका स्थानकावरून दुसऱ्या स्थानकावर जाण्यासाठीचा दर हा फक्त 5 रुपये आहे.

ही मेट्रो दोन टप्प्यात बांधली जात आहे. कोलकाता मेट्रोचा पूर्व-पश्चिम प्रकल्प सुमारे 16 किमी लांबीचा असून, तो सॉल्ट लेक स्टेडियम ते हावडा मैदानापर्यंत पसरलेला आहे. पहिला टप्पा सॉल्ट लेक सेक्टर-5 ते सॉल्ट लेक स्टेडियम दरम्यान 5.5 किमी लांबीचा आहे. या मार्गावर करुणमयी, सेंट्रल पार्क, सिटी सेंटर आणि बंगाल केमिकल मेट्रो स्टेशन आहेत. दुसरा टप्पा भूमिगत मेट्रोच्या 11 किमी लांबीचा आहे. हा मोठा बोगदा तयार करण्यापूर्वी संपूर्ण सल्ला आणि माहिती रशिया आणि थायलंडच्या तज्ञांकडून घेण्यात आली आहे. यासह पाण्याचे गळती थांबविण्यासाठी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. (हेही वाचा: आता नाशिक मध्ये धावणार विना रुळांची हायब्रीड मेट्रो, लवकरच सुरु होणार काम; मुख्यमंत्र्यांची घोषणा)

पाण्याच्या गळतीपासून बचाव करण्यासाठी सुरक्षा पातळीचे 3 स्तरही तयार केले गेले आहेत. ही मेट्रो बोगदा ताशी 80 किलोमीटर वेगाने धावणार आहे. हा प्रकल्प 2009 पासून सुरू आहे. विद्यमान रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या कार्यकाळातही हे काम झपाट्याने होत आहे. 2021 पर्यंत ही संपूर्ण फेज सुरु होईल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 8575 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.