छत्तीसगड येथे अनोखा 'Garbage Cafe' सुरु; प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात मिळणार मोफत नाश्ता, जेवण
'Garbage Cafe' in Chhattisgarh (Photo Credits: ANI)

प्लास्टिकमुळे पर्यावरणाची होणारी हानी याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी प्लास्टिक बंदीही करण्यात आली आहे. मात्र प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी आपण स्वतःहून कोणते पाऊल उचलले आहे का? कदाचित अनेकांचे उत्तर नाही असेल. मात्र छत्तीसगड  येथे प्लास्टिक कचरा होऊ नये म्हणून एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान लक्षात घेऊन छत्तीसगड मध्ये भारतातील पहिला Garbage Cafe सुरु करण्यात आला आहे. छत्तीसगडच्या (Chhattisgarh) अंबिकापूर महानगर पालिकेच्या (Ambikapur Municipal Corporation) वतीने हा गार्बेज कॅफे सुरू करण्यात आला आहे. या कॅफेत एक किलो प्लास्टिक दिल्यास त्याबदल्यात मोफत जेवण मिळणार आहे. तर 500 ग्रॅम प्लास्टिक कचऱ्याच्या मोबदल्यात मोफत नाश्ता दिला जाणार आहे. या कॅफेमुळे शहर स्वच्छ राहण्यास नक्कीच मदत होईल.

ANI ट्विट:

याबद्दल माहिती देताना महापौर अजय तिरके म्हणाले की, "आमच्याकडे 1 किलो प्लास्टिक आणून देणाऱ्यांना आम्ही मोफत जेवण देत आहोत. यामुळे शहर स्वच्छ राहण्यास मदत होईल."

छत्तीसगडच्या अंबिकापूर महानगरपालिकेने सुरु केलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यामुळे पर्यावरणाची हानी टळेल, शहर-परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर गोर-गरीब, गरजूंना एक वेळचे जेवणही मोफत मिळेल.