प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

संपूर्ण देश कोरोना विषाणू (Coronavirus) साथीशी झुंज देत आहे. भारतामध्ये कोरोना रूग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने भीती आणि चिंता निर्माण झाली आहे. अशात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हैदराबादच्या (Hyderabad) नेहरू झूलॉजिकल पार्क (Nehru Zoological Park) येथे आठ आशियाई सिंह (Asiatic Lions) कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सेंटर फॉर सेल्युलर एंड मॉलिक्यूलर बायोलॉजीने म्हटले आहे की, नेहरू झूलॉजिकल पार्क येथे या सिंहांची आरटी-पीसीआर चाचणी सकारात्मक आली आहे. द हिंदूने याबाबत वृत्त दिले आहे. प्राण्यांना कोरोना विषाणूची लागण होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. या सिंहांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर खबरदारी म्हणून प्राणिसंग्रहालय बंद करण्यात आले आहे.

वृत्तानुसार, पशुवैद्यकांनी सांगितले की, सिंहांमध्ये भुकेची कमी, नाकातून पाणी निघणे आणि खोकला अशी लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सिंहाचे नमुने घेतले आणि त्यांना चाचणीसाठी पाठविले. आता त्यांचा अहवाल सकारात्मक आला आहे. त्यापैकी चार नर सिंह असल्याचे सांगितले जात आहेत. तपासणी करणारे डॉक्टर आणि कर्मचारी यांचे म्हणणे आहे की, आजूबाजूला आलेल्या संक्रमित लोकांकडून हे संक्रमण सिंहापर्यंत पसरले आहे. याआधी प्राणीसंग्रहालयात काम करणारे बरेच लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे.

त्याच वेळी, नेहरू झूलॉजिकल उद्यानाचे क्यूरेटर आणि संचालक डॉ. सिद्धानंद कुकरेती म्हणाले की, या सिंहांमध्ये कोविडची लक्षणे दिसल्यानंतर 29 एप्रिल रोजी त्यांची आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात आली होती. मात्र डॉ. सिद्धानंद कुकरेती यांनी अद्याप या वृत्तास अधिकृतपणे दुजोरा दिला नाही. ते म्हणाले की, मला अद्याप आरटी-पीसीआर अहवाल मिळालेला नाही आणि म्हणूनच आता यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. सध्या सर्व सिंहाची प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. (हेही वाचा: उत्तराखंड मधील चारधाम मंदिराचे दरवाजे खुलण्यासह कोरोनासंबंधित SOP जाहीर)

दरम्यान, यापूर्वी असा दावा केला जात होता की कोरोना संसर्ग प्राण्यांमध्ये पसरत नाही. पण गेल्या वर्षी अमेरिकेत अनेक वाघ कोरोना सकारात्मक आढळले होते. त्याच वेळी, हाँगकाँगमधील बर्‍याच मांजरी आणि कुत्र्यांमध्येही कोरोनाची लक्षणे दिसली होती.