भांडण झाल्याने माहेरी गेलेल्या बायकोने सासरी येण्यास नकार दिल्याने संतापलेल्या नवऱ्याने पोटच्या दोन अल्पयीन मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना मेरठच्या (Meerut) अनुपनगर (Anupnagar) फजलपूर (Fazalpur) भागात घडली आहे. ही घटना शुक्रवारी (13 ऑगस्ट) घडली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी कांकेरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अरूण कुमार असे आरोपीचे नाव आहे. अरुण हा मजूर असून काही दिवसांपूर्वी त्याचे पत्नीसोबत भांडण झाले होते. ज्यामुळे त्याची पत्नी तिच्या माहेरी आई-वडिलांकडे राहायला गेली होती. दरम्यान, शुक्रवारी पत्नीला घरी परत आणण्यासाठी सासरी गेला होता. मात्र, त्यावेळी पत्नीने माहेरहून परतण्यास नकार दिला. यावर संतापलेल्या अरुणने आपल्या दोन्ही मुलींना जबरदस्तीने घरी घेऊन आला. त्यानंतर मध्यरात्री आपल्या दोन्ही मुलींची गळा आवळून हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला. हे देखील वाचा- UP Rape Case: विकृतीचा कळस ! उत्तर प्रदेशमध्ये 3 महिन्याच्या मुलीवर 17 वर्षाच्या मुलाने केला बलात्कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणने काही दिवसांपूर्वी रागाच्या भरात त्याच्या घराला आग लावली होती, त्यात काही मौल्यवान वस्तू आणि कागदपत्रे जळून राख झाली होती. त्यावेळी झालेल्या भांडणानंतर त्याची पत्नी घर सोडून गेली. एवढेच नव्हेतर, अरूणला दारूचे व्यसन असून पत्नीने दोन मुलींना जन्म दिल्याबद्दल तिला टोमणे मारायचा. यामुळेही त्यांच्यात वाद होत असे. शेजाऱ्यांनी अनेकदा त्यांचे भांडण मिटवल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. सध्या तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.