जनार्दन रेड्डी File Image | (Photo Credits: PTI)

'ऍम्बिडंट ग्रुप' या खासगी उद्योगसमूहाच्या मालकाने जनार्दन रेड्डी यांच्यावर 18 कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशात वेगवेगळ्या प्रकारे उमटले होते. शेवटी आज (रविवार) बंगळूरु पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे विभागाच्या (सीसीबी) पथकाने जनार्दन रेड्डींच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत. जनार्दन रेड्डी हे कर्नाटकचे माजी मंत्री, खाणसम्राट आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. तब्बल 600 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सामील असलेली कंपनी आणि तिचा मालक सईद अहमद फरीद याला वाचवण्याचा रेड्डी यांच्यावर आरोप आहे.

गुन्हे शाखेने मागील रविवारी रेड्डी यांच्या बळ्ळारीतील निवासस्थानांवर छापे टाकल्यानंतर त्यांच्याविरोधात नोटीस बजावली होती. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेले जनार्दन रेड्डी काल (शनिवार) सायंकाळी बंगळूर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर झाले होते. आज त्यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. बंगळरू गुन्हे अन्वेषण विभागाने जनार्दन रेड्डींचा विश्वासू असेलेला अली खानलाही बेड्या ठोकल्या आहेत.

जनार्दन रेड्डी यांना पोंजी घोटाळा आणि लाच प्रकरणी अटक झाली आहे. आता त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असून, गुंतवणुदारांचे पैसे परत मिळविण्यासाठी तपास सुरु केला गेला असल्याची माहिती सीसीबीचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अलोककुमार यांनी दिली.

जनार्दन रेड्डी यांचा बेल्लारी येथे मोठा खाणीचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर खाण माफिया असल्याचा आरोपही आहे. तसेच सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक अशीही त्यांची ओळख आहे. यापूर्वी जनार्दन रेड्डी यांना 2012 साली खाण घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र काही महिन्यांपूर्वीच ते जामीनावर बाहेर आले होते.