Chhattisgarh: बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर 15 जवान बेपत्ता, 5 शहीद; तर 30 जण गंभीर जखमी
Indian jawans (PC - ANI)

Chhattisgarh: छत्तीसगडच्या सुकमा-बिजापूर सीमावर्ती (Sukma-Bijapur Border) भागात शनिवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 5 सैनिक शहीद झाले असून 30 जवान जखमी झाले आहेत. ताज्या माहितीनुसार, या चकमकीनंतर 15 सैनिक बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय शहीद झालेल्या पाच जवानांपैकी दोन जवानांचे मृतदेह सापडले आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, चकमकीच्या ठिकाणी एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेहही सापडला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैनिकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी झालेल्या 23 जवानांना बिजापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर सात जवानांना रायपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्यातील नक्षलविरोधी कारवाईचे पोलिस उपमहानिरीक्षक ओ.पी. पाल यांनी सांगितले की, बिजापूर व सुकमा जिल्ह्याच्या सीमा भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या दरम्यान झालेल्या चकमकीत पाच सुरक्षा जवान शहीद झाले आणि 30 सैनिक जखमी झाले. शुक्रवारी रात्री नक्षलविरोधी कारवाईत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कोब्रा बटालियन, बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यातील डीआरजी आणि एसटीएफची संयुक्त टीम रवानगी केली गेली. बिजापूर जिल्ह्यातील तर्रेम, उसूर आणि पामेड आणि सुकमा जिल्ह्यातील मिनपा व नरसापुरम येथून सुमारे दोन हजार सैनिक नक्षलविरोधी कारवाईत सहभागी होते. (वाचा - जम्मू-काश्मीर: शोपियनच्या पीर की गली भागात भारतीय सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक)

दरम्यान, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, चकमकीत कोब्रा बटालियनचा एक जवान, बस्तरिया बटालियनचे दोन सैनिक आणि डीआरजीचे दोन जवान असे एकूण पाच जवान शहीद झाले आहेत. चकमकीत पाच जवान शहीद झाल्यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला आहे.