Talathi Bharti 2022: राज्यात तलाठी पदासाठी होणार मेगाभरती, राज्य सरकारकडून मोठी घोषणा
Representational Image (Photo Credit: File Image)

राज्यात दिवसेनदिवस सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. अनेक तरुण तरुणी रोजगाराची संधी मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यात सरकारी नोकरी मिळण म्हणजे भाग्यचं. पण आता राज्यातील नोकरीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. कारण राज्य सरकराकडून तलाठी पदासाठी मोठ्या पदभरतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल ३ हजारांहून अधिक तलाठी पदासाठी नोकरभरती केल्या जाणार आहे. तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांना या संधीतून सहज सरकारी नोकरी मिळू शकते. नाशिक, नागपूर, पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद या पाचही डिव्हीजनमधून विविध जिल्ह्यात तलाठ्यांची मेगापदभरती करण्यात येणार आहे. राज्यात तलाठी साझे व मंडळ कार्यालयांसाठी एकूण ३११० तलाठी आणि ५१८ मंडळ अधिकारी याप्रमाणे एकूण ३६२८ पद भरतीला शासन मान्यता देण्यात आली आहे.

 

 

कोकण जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे तलाठी पदांच्या एकूण ५५० तर महसूल मंडळाच्या एकूण ९१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर उत्तर महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी नाशिक महसूल विभागाअंतर्गत नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर येथे तलाठीची ६८९ पदे तर महसूल मंडळाच्या ११५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. औरंगाबाद महसूल विभागाअंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, परभरणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये तलाठीच्या एकूण ६८५ तर महसूल अधिकारींच्या ११४ रिक्त जागा भरल्या जाणार असुन मराठवाड्यातील युवकांना सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. (हे ही वाचा:- Government Job: आता सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एमपीएससी पास करण्याची गरज नाही, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा)

 

 

तसेच विदर्भातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी देखील ही मेगाभरती आनंदाची बातमी आहे. तलाठी नागपूर महसूली विभागाअंतर्गत येणाऱ्या नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्याअंतर्गत तलाठीच्या ४७८ तर महसूल अधिकारींच्या एकूण ८० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अमरावती महसूली विभागाअंतर्गत येणाऱ्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांअंतर्गत तलाठीच्या एकूण १०६ तर महसूल अधिकारींच्या एकूण १८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पुणे महसूली विभागाअंतर्गत येणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तलाठीची एकूण ६०२ तर महसूल अधिकाऱ्याच्या एकूण १०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.