State University Exams: महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा होणार ऑफलाइन; कुलगुरूंमध्ये झालेल्या बैठकीत घेतला निर्णय 
Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ऑफलाइन (Offline Exams) घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. शिक्षणमंत्री उदय सामंत आणि राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर्वांनी एकमताने एप्रिल ते मे 2022 दरम्यान ऑफलाइन परीक्षेची निवड करण्याचे मान्य केले. 25 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलून त्या ऑनलाइन घेण्याचा निर्णय नागपूर विद्यापीठ प्रशासनाने घेतल्याने हा नवा निर्णय घेण्यात आला आहे.

26 एप्रिल रोजी सामंत यांनी ट्विटरवर सांगितले की, ‘कुलगुरूंच्या बैठकीमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठ कुलगुरु ठाम आहेत. परीक्षा घेताना विध्यार्थ्यांना प्रश्न संच विद्यापीठ देणार आहे, दोन पेपरमध्ये 2 दिवसाचे अंतर असणार आहे. परीक्षा मेमध्ये न घेता 1 जून ते 15 जुलैपर्यंत होतील असे मा. कुलगुरूनी निश्चित केले आहे.’

याआधी मार्चमध्ये मुंबई विद्यापीठाने एक परिपत्रक जारी करून जाहीर केले होते की, यावर्षी पारंपारिक अभ्यासक्रमांच्या सेमिस्टर 6 च्या परीक्षा ऑनलाइन घेतल्या जातील, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्व परीक्षा आणि सर्व विभागांच्या पदव्युत्तर परीक्षाही ऑफलाइन घेतल्या जातील. (हेही वाचा: UGC आणि AICTE कडून भारतीय विद्यार्थ्यांना पाकिस्तान मध्ये उच्च शिक्षणासाठी न जाण्याचा सल्ला)

दुसरीकडे, राज्यात दोन प्रमुख स्पर्धा परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. यामागचे कारण म्हणजे, इतर प्रमुख परीक्षांच्या तारखाही याच दिवशीच्या आहेत. त्यामुळे MHT CET आणि Law CET (पाच वर्षे) च्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. नवीन वेळापत्रकानुसार, आता महाराष्ट्र आरोग्य आणि तांत्रिक – सामायिक प्रवेश परीक्षा 05 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2022 या कालावधीत घेतली जाईल आणि कायदा सामायिक प्रवेश परीक्षा 18 आणि 19 जून 2022 रोजी घेतली जाईल.