Exam Dates| Image used for representational purpose | (Photo Credits: Unsplash.com)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशभरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच पहिली ते आठवीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता महत्त्वाची समजली जाणारी MPSC ची परीक्षा देखील पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. यावर सविस्तर चर्चा केल्यानंतर राज्यसेवा आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलली आहे. 5 एप्रिलला होणारी राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा आता 26 एप्रिलला होणार आहे. महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाने ही माहिती दिली आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे या परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोना व्हायरस मुळे महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार, 26 एप्रिलला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 होईल. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा 10 मे ला होईल.

हेदेखील वाचा- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर MPSC च्या परिक्षा पुढे ढकलण्याची राज्य सरकारकडून सुचना

MPSC चे ट्विट:

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारताचा आता अत्यंत कठीण काळ सुरू झाला आहे. यामध्ये कोरोना व्हायरस झपाट्याने वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. पूर्वी केवळ मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड या भागात लागू असलेले कलम 144 आता राज्यभर लागू करण्यात आल्या आहेत. मुंबई शहरामध्ये आज मध्यरात्रीपासून मुंबई लोकल बंद करण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवा देणार्‍यांना आता बससेवेचा फायदा घेता येणार आहे. अत्यावश्यक सेवामध्ये भाजीपाला, किराणा माल दुकानं, मेडिकल स्टोअर्स, आर्थिक व्यवहारांसाठी बॅंक आणि शेअर बाजार खुला राहणार आहेत.