महाराष्ट्रामध्ये यंदा कोविड 19 च्या दहशतीखाली दहावी (SSC Exam) ,बारावीच्या परीक्षा (HSC Exams) ऑफलाईन घेण्यावर शिक्षण मंडळ ठाम आहे. काही दिवसांपूर्वी सुरक्षित वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी याकरिता विशेष नियमावली जारी झाली आहे. 4 मार्च पासून सुरू होणार्या बारावीच्या परीक्षेसाठी आज (9 फेब्रुवारी) पासून हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून ही हॉलतिकीट्स www.mahahsscboard.in वर जारी करण्यात येणार आहेत.
दरम्यान शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट www.mahahsscboard.in ला भेट द्या. त्यामध्ये कॉलेज लॉगिन वर क्लिक करून हॉलतिकीट्स डाऊनलोड साठी उपलब्ध होणार आहेत. ही हॉल तिकीट्स कॉलेज कडून डाऊनलोड करून प्रिंट करून मुख्यध्यापकांच्या सही, शिक्क्याने दिली जाणार आहेत. इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन.
शिक्षण मंडळाच्या नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या माहिती मध्ये विद्यार्थ्यांना जर नाव, विषय, माध्यम अशामध्ये काही चूका असल्यास बदल करायचे असल्यास विभागीय मंडळाकडे ती पाठवावी लागणार आहेत. फोटो मध्ये काही दोष असल्यास तो बदलून मुख्यध्यापकांच्या सही, शिक्क्याने तो स्वीकारला जाऊ शकतो.
12वीची परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान होणार आहे आणि तोंडी परीक्षा 14 फेब्रुवारी पासून होणार आहे. काही दिवसांपूर्वी 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने सरावासाठी आणि ताण कमी करण्यासाठी प्रश्नपेढी देखील उपलब्ध करून दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांवरील मानसिक दडपण कमी करण्यासाठी विभागीय स्तरावरील समुपदेशकांची यादी देखील प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे ताण-तणाव दूर सारून विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून परीक्षेला सामोरं जाण्याचं आवाहन केले आहे.