महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) राज्यातील दहावी बोर्ड परीक्षा 2024 चा निकाल (Maharashtra Board SSC Result) जाहीर करण्यात आला आहे. यंदा दहावीचा एकूण निकाल 95.81 % लागला आहे. तर रिपीटरचा निकाल 51 टक्के लागला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही निकालामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. 97.21% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर 94.56% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. तर 9 विभागीय मंडळांमध्येही कोकण विभागाचा निकाल अव्वल आहे. नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. बोर्डाकडून दहावी बोर्डाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर,अमरावती,लातूर,कोकण आणि नाशिक अशा नऊ ही विभागीय मंडळाची टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना ठीक 1 वाजता त्यांचे ऑनलाईन निकाल results.digilocker.gov.in, mahresult.nic.in, sscresult.mahahsscboard.in, sscresult.mkcl.org वर पाहता येणार आहे. तसेच SMS द्वारा पाहण्यासाठी “MHSSC [space] Seat Number” हा मेसेज 57766 वर पाठवल्यास तुम्हांला निकाल मोबाईल वरही पाहता येणार आहे.
कसा पहाल दहावीचा निकाल ऑनलाईन?
MSBSHSE च्या दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि आईचं नाव या दोन गोष्टींच्या माहितीच्या आधारे पाहता येणार आहे.
- दहावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी वेबसाईटला भेट दिल्यानंतर होमपेज वर 10वी निकालाचा पर्याय निवडा.
- आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडीरेक्ट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करा.
- त्यापुढे View Result वर क्लिक करा.
- तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल.
- तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे.
दहावी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयामध्ये किमान 35% गुण आवश्यक आहेत. आज ऑनलाईन निकालानंतर दहा दिवसांनी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये त्यांची गुणपत्रिका मिळणार आहे. तसेच यापुढे 11वी प्रवेशाची देखील प्रक्रिया सुरू होणार आहे. तर अपेक्षित निकाल न लागलेल्यांना गुणांची फेर पडताळणी, उत्तरपत्रिका फोटोकॉपी, उत्तर पत्रिका पुन्हा तपासणी यासाठी verification.mh-ssc.ac.in ला भेट देऊन अर्ज करता येईल. ही सुविधा सशुल्क आहे. जुलै महिन्यात पुरवणी परीक्षेचं देखील आयोजन करण्यात आलं आहे.