धक्कादायक : आश्रम शाळेत शिक्षा म्हणून मुलींच्या प्रायव्हेट पार्टसमध्ये टाकली मिरची पावडर; चार महिला कर्मचाऱ्यांना अटक
Image Courtesy: ANI/Facebook

दिल्लीच्या आश्रमशाळेत एखादे काम ठीक केले नाही म्हणून, शिस्तीच्या नावाखाली मुलींवर अनन्वित अत्याचार होत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या आश्रम शाळेत मुलींना जबरदस्तीने मिरची पावडर खायला लावली जात आहे, तसेच मुलींच्या प्रायव्हेट पार्टसमध्ये मिरची पावडर टाकली जाते. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी या आश्रम शाळेतील महिला कल्याण अधिकाऱ्यासह 4 जणांना अटक केली आहे. यामध्ये 2 हाऊस मदर आणि एका होम इंचार्जचा समावेश आहे. आज त्यांना न्यायालयासमोर सादर केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली महिला आयोगाच्या एका समितीने 27 डिसेंबर 2018 रोजी, या आश्रमशाळेची पाहणी करण्याच्या निमित्ताने भेट दिली होती. यावेळी त्यांनी इथल्या मुलींशी संवाद साधला. त्यावेळी मुलींनी आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली. तसेच आपल्याकडून अनेक प्रकारची कामे करवून घेत असल्याचेही तक्रार केली. इथे मुलींना सर्व घरगुती कामे करावी लागतात. तसेच येथे पुरेसे कर्मचारी नसल्याने त्यांना लहान मुलींचाही सांभाळ करावा लागतो. स्वयंपाकघरात काम करावे लागते. तसेच काही चूक झाल्यास येथील मुलींना अत्यंत गंभीर शिक्षा दिली जाते. आश्रमशाळेतील लहान मुलींनाही शिक्षा म्हणून भांडी, कपडे धुण्यास तसेच खोल्या आणि शौचालय स्वच्छ करायला लावण्यात आले असल्याचे या मुलींनी सांगितले.

महिला आयोगाच्या सदस्यांनी ही सर्व माहिती प्रमुख स्वाती मलीवाल यांना दिली. त्यांनतर स्वाती मलीवाल यांनी द्वारकाच्या पोलीस उपायुक्तांशी संवाद साधला. त्यांनी तात्काळ पोलिसांचे एक पथक पाठवत मुलींचे जबाब नोंद करुन घेतले. त्यानुसार आश्रम शाळेतील या कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.