Dagdi Chawl 2 : आता पुन्हा होणार गँगवॉर; दगडी चाळ 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
दगडी चाळ 2 (Photo credit : youtube)

बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये एखादा सिनेमा लोकप्रिय ठरला, की लगेच त्याचा दुसरा-तिसरा भाग काढला जातो. काही अपवाद वगळता असे सिक्वलदेखील लोकप्रिय ठरले आहेत. मराठीमध्ये क्वचितच असे प्रकार पाहायला मिळाले आहेत. यातील एक महत्वाचे उदाहरण म्हणजे मुंबई–पुणे–मुंबई. याच धर्तीवर अजून एका सुपरहिट चित्रपटाचा सिक्वल येत आहे, तो म्हणजे दगडी चाळ. संगीता अहिर निर्मित आणि चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ' (Daagdi Chaawl) 2015 साली प्रदर्शित झाला. गँगवॉर हा या चित्रपटाचा मध्यवर्ती विषय होता, तर मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) यांनी साकारलेली अरुण गवळी (Arun Gawli) ची भूमिका चित्रपटाची मुख्य व्यक्तिरेखा होती.  अल्पावधीतच हा चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरला. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे. नुकताच या नवीन चित्रपटाचा लोगो प्रदर्शित करण्यात आला.

हिंदीमध्ये गँगवॉरवर आधारीत बक्कळ सिनेमे बनले आहेत, मात्र मराठीमध्ये प्रथमच अशा प्रकारची कथा पाहायला मिळाली होती. दगडी चाळ मध्ये डॅडी हे वास्तविक पात्र असले तरी कथा काल्पनिक होती, मात्र या चित्रपटातील संवाद, अॅक्शन, संगीत, अभिनय अशा सर्वच गोष्टींनी लोकांना भुरळ पाडली. ‘चुकीला माफी नाही’ हा मकरंद देशपांडेचा डायलॉग तर तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला होता. आता दुसऱ्या भागातही अशीच अॅक्शन आणि केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

दुसऱ्या भागातली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, अरुण गवळींची कन्या योगिता गवळी या सिनेमाच्या सहनिर्मितीची भूमिका पार पाडत आहे. पहिल्याप्रमाणेच दुसऱ्या भागातही डॅडींच्या भूमिकेत मकरंद देशपांडे असण्याची शक्यता आहे तसेच 'दगडी चाळ 2'चे दिग्दर्शनही चंद्रकांत कणसेच करणार आहेत. आता इतर भूमिकांसाठी कोणा कोणाची वर्णी लागतेय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.