Shrikant Moghe (Photo Credits: Instagram)

मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे (Shrikant Moghe) यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. पुण्यातील राहत्या घरी आज (शनिवार, 6 मार्च) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्यानं  मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. श्रीकांत मोघे यांनी 60 हून अधिक नाटकांत आणि 50 हून अधिक सिनेमांत काम केलं होतं. आपल्या नाट्यप्रवासावर 'नटरंगी रंगलो' हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलं आहे.

मराठी रंगभूमी आणि सिनेमातील ‘चॉकलेट हिरो’ म्हणून त्यांची ओळख होती.  'लेकुरे उदंड जाली', 'वाऱ्यावरची वरात', 'तुज आहे तुजपाशी', 'गरुडझेप' या त्यांच्या नाटकांना विशेष पसंती मिळाली होती. त्याचबरोबर 'मधुचंद्र', 'सिंहासन' या चित्रपटातील त्यांच्या भूमिका देखील तुफान गाजल्या.

मुलगा शंतनु मोघे आणि सून प्रिया मराठे यांच्यासोबतचे फोटोज:

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Marathe (@priyamarathe)

श्रीकांत मोघे यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1929 साली किर्लोस्करवाडी येथे जन्म झाला. दहावीपर्यंतचं शिक्षण किर्लोस्करवाडी येथे झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी सांगलीतील विलिंग्डन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुण्याच्या स.प.कॉलेजामधून त्यांनी बीएस्सीचं शिक्षण पूर्ण केलं. बी.आर्च ही पदवी त्यांनी मुंबईत ग्रहण केली. मात्र शाळेत असल्यापासूनच त्यांचा नाट्यक्षेत्राकडे ओढा होता. दरम्यान, वृत्त निवेदक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

नाटक, सिनेमांमधील श्रीकांत मोघे यांच्या कारकीर्दीमुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, काशीनाथ घाणेकर पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा पुरस्कार, केशवराव दाते पुरस्कार, गदिमा पुरस्कार, प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कलागौरव पुरस्काराने देखील त्यांना गौरवण्यात आले होते.