Daughters Day 2020: ज्योती-अमृता सुभाषसह 'या' 4 मायलेकींच्या जोड्या आहेत मराठी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय
Best Mother Daughter Jodi in Marathi Industry (Photo Credits: Instagram)

'मुलगी झाली प्रगती झाली' असे म्हणतात ते काही उगाच नाही. मुलगी ही आई-वडिलांसाठी त्यांच्या काळजाचा तुकडा असते. त्यांच्या संस्काराची शिदोरी असते. अशा मुलीच्या सन्मानासाठी 27 सप्टेंबर हा दिवस 'राष्ट्रीय कन्या दिन' (National Daughters Day) म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त आज आपण मराठी सिनेसृष्टीत (Marathi Film Industry) स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या माय लेकींच्या 4 लोकप्रिय जोड्यांविषयी बोलणार आहोत. अशा मायलेकींच्या (Mother-daughter) जोड्या ज्यांची ओळख मराठी सिनेसृष्टीत एकमेकींच्या नावावरुन होते. तशा मराठी सिनेसृष्टीत अनेक मायलेकींच्या जोड्या आहेत मात्र यात 4 जोड्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य केले आहे.

राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त या जोड्यांची विशेष ओळख करुन देण्यामागचे कारण म्हणजे यांच्यात जरी मुली-आईचे नाते असले तरीही आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यातील प्रत्येकाने स्वत:ची ओळख निर्माण करुन स्वत:ला सिद्ध केले आहे. National Daughter's Day 2020: राष्ट्रीय कन्या दिवस यंदा कधी साजरा होणार? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास

1. ज्योती-अमृता सुभाष (Jyoti-Amruta Subhash)

या दोघी मराठी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय आहेत. अमृताने तिची आई ज्योती सुभाष यांच्यासोबत आजी, झोका, गंध, मसाला, नितळ, वळू, विहिर या सिनेमांमध्ये काम केले आहे. आजी या सिनेमात ज्योती सुभाष यांनी अमृताच्या आजीची भूमिका केली होती. तर 2009 मध्ये आलेल्या गंध या सिनेमात या दोघी आई-मुलीच्या भूमिकेत झळकल्या होत्या. यासोबत राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या 'गली बॉय' या चित्रपटात ज्योती सुभाष आणि अमृता सुभाष यांनी एकत्र काम केले होते.

2. शुभांगी-सई गोखले (Shubhangi-Sai Gokhale)

शुभांगी गोखले आणि त्यांची लेक सई गोखले यांनी एकत्र काम केले नसले तरीही ही जोडी प्रेक्षक खूप पसंत करतात. सई ने 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. तर शुभांगी गोखले यांना 'श्रीयुत गंगाधर टिपरे' या मालिकेत साकारलेली श्यामला आजही लोकांच्या स्मरणात आहे.

3. मीना नाईक-मनवा नाईक (Meena-Manva Naik)

मीना नाईक आणि मनवा नाईक यांनी ढिनच्यॅक एंटरप्राइज या चित्रपटात एकत्र काम केले होते. मनवाने 'जोधा अकबर' या हिंदी चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन सोबत काम केले होते.

4. ज्योती-तेजस्विनी पंडित (Jyoti-tejaswini Pandit)

तेजस्विनी पंडित आणि तिची आई ज्योती चांदेकर यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट 'सिंधुताई सकपाळ' एकत्र काम केले होते. यात तेजस्विनी तरुण वयातील तर ज्योती चांदेकर वृद्धावस्थेतील सिंधुताई सकपाळ दाखविण्यात आल्या होत्या.

या माय लेकींच्या जोड्यांनी मराठी सिनेसृष्टीला दिलेले योगदान खरच कौतुकास्पद आहे. आपल्या आईकडून मिळालेला अभिनयाचा वारसा या मुलींनी पुढे असाच कायम सुरु ठेवला. या सर्वांना आज राष्ट्रीय कन्या दिनाच्या लेटेस्टली मराठीकडून खूप खूप शुभेच्छा!