Kabir Singh Teaser: रागीट, दारुडा, डॉक्टर शाहीदचा नवा अंदाज; धीस इज मी म्हणत 'कबीर सिंह'चा टीजर प्रदर्शित (Video)
Kabir Singh teaser starring Shahid Kapoor is here. (Photo Credits: YouTube/Screengrab/T-Series)

गेल्या कित्येक महिन्यांपासून स्वतःला परत सिद्ध करण्यासाठी शाहीद कपूर (Shahid Kapoor)ला एका हिटची प्रतीक्षा होती. आता त्याचा बहुप्रतीक्षित ‘कबीर सिंह’ चा टीजर पाहून शाहीद परत एकदा धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज असल्याचे दिसत आहे. ‘कबीर सिंह’ हा दक्षिणेतील सुपरहिट चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ (Arjun Reddy)चा हिंदी रिमेक आहे. अर्जुन रेड्डीमध्ये  विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) या अभिनेत्याने भूमिका साकारली होती, आणि त्याचे बरेच कौतुकही झाले होते. मात्र कबीर सिंहचा टीजर पाहून शाहीदही कुठेच कमी पडला नसल्याचे जाणवत आहे.

टीजरमध्ये शाहीदची विविध रूपे आणि व्यक्तिमत्वाचे पैलू दिसतात. मात्र या सर्वामध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे दारू. या चित्रपटात शाहिद वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. टीजरवरून कथेची कल्पना येत नसली तरी यातील प्रत्येक फ्रेम आणि शाहीदचा अभिनय तुम्हाला आकर्षित करतो. एकेकाळी चॉकलेट बॉय म्हणून ओळखला गेलेला शाहीद या चित्रपटात अगदी रावडी लूकमध्ये समोर येतो, जे त्याच्या चाहत्यांसाठी ट्रीट असणार आहे.

शाहीदसोबत कियारा अडवाणी (Kiara Advani) मुख्य भूमिकेत आहे. टीजरमध्ये कियारा अगदी काही सेकंदापुरती दिसते. पण यातही तिच्या चेहऱ्यावरचे भाव मन जिंकून घेतात. कियाराला दीर्घकाळापासून अशा एका भूमिकेची गरज होतीच. हा चित्रपट 21 जून 2019 ला प्रदर्शित होत आहे. अर्जुन रेड्डीचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) यांनीच कबीर सिंहचे दिग्दर्शन केले आहे.