
Nana Patekar Birthday Special: अभिनेते नाना पाटेकर यंदा 69 वा वाढादिवस साजरा करत आहेत. वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेक चढ उतार पाहिलेला हा रूपेरी पडद्यावरील सुपरस्टार आणि बॉलिवूडचा खरा अॅंग्री यंग मॅन अभिनयापलिकडे आपलं सारं स्टारडम विसरून एका सामान्य माणसाचं आयुष्य जगतानाही सामाजिक भान जपतो. कधी शेतकर्यांसाठी, कधी दुष्काळग्रस्तांसाठी रांगड्या नाना पाटेकरांच्या व्यक्तिमत्त्वातील काही हळवे पैलू कदाचित तुम्हांला ठाऊक नसतील. 1 जानेवारी 1951 दिवशी कोकणात नाना पाटेकरांचा जन्म झाला. त्यानंतर आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यांनी मराठी नाट्यक्षेत्र, सिनेमा ते बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली.
नाना पाटेकरांंबाबत काही खास गोष्टी
- चित्रकार नाना पाटेकर
नाना पाटेकरांंनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मधून शिक्षण घेतलं आहे. त्यांना चित्रकलेची हौस होती. सिनेक्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी मुंबई पोलिसांसाठी गुन्हेगारांचं स्केचिंग करत.
नाना पाटेकर शूटिंगसाठी सेटवर जाण्यापूर्वी त्याची खास तयारी करतात. एका मुलाखतीमध्ये नाना पाटेकरांनी दिलेल्या माहितीनुसार, ते स्वतः त्यांचे डायलॉग्स लिहून काढतात. या पद्धतीमध्येच त्यांचे पाठांतर होते.
- शेतकर्यांचा आधारवड
शेतकर्यांच्या आधारासाठी नाना पाटेकर अनेकदा त्यांच्यासोबत शेतात राबताना दिसले आहेत. दरम्यान अभिनेते मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी एकत्र येऊन 'नाम' ही संस्था शेतकर्यांच्या मदतीसाठी सुरू केली आहे. त्याच्या माध्यमातून ते मदत करतात. पूरग्रस्तांपासून आत्महत्या केलेल्या कर्जबाजारी शेतकरी कुटुंबाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.
आईसाठी हळवे
नाना पाटेकर आणि त्यांच्या आईचं खास नातं होतं. नाना पाटेकरांच्या वडिलांच्या निधनानंतर नाना पाटेकरांनी आईला सांभाळलं. केवळ आईच्या शब्दाखातीर त्यांनी घरागुती गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली. मागील वर्षी नाना पाटेकरांच्या आईचं निधन झालं. आता हा वसा त्यांचे पुत्र सांभाळतात.
घरगुती गणपती सामान्यांसाठी खुला
नाना पाटेकरांच्या घरगुती गणपती हा पारंपारिक, पर्यावरणपूरक साजरा केला जातो. खास गोष्ट म्हणजे 10 दिवसांच्या गणेशोत्सवाच्या काळात नाना पाटेकर जातीने सारं पाहतात. त्यांचा घरातील गणपती सामान्यांसाठीही दर्शनासाठी खुला असतो.
मराठी रंगभूमी ते बॉलिवूड पर्यंत आपल्या अभिनयाच्या गुणांनी, स्वभवामुळे नाना पाटेकरांनी आपली खास भूमिका मांडली आहे. मागील काही दिवसांपासून नाना पाटेकर आणि तनुश्री यांच्यामधील वाद चर्चेत आहे. त्यामुळे नाना पाटेकर यांच्या स्वभावाविषयी, त्यांच्या कलाकारांसोबतच्या वागणुकीबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण पडद्यावर दिसणार्या रांगड्या नाना पाटेकरांच्या व्यक्तिमत्त्वाला एक हळवी किनार देखील आहे.