Rishi Kapoor Passes Away: ऋषी कपूर यांच्या निधनानं सदाबहार व्यक्तिमत्त्व हरपलं; महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या भावना
Rishi Kapoor (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं. यांच्या निधनानंतर सर्व बॉलिवूड कलाकार हळहळले. चाहतावर्ग सून्न झाला. तर ऋषि कपूर यांचे निधन राजकीय विश्वासाठी देखील धक्कादायक ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत ऋषि कपूर यांना श्रद्धाजंली वाहिली. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ऋषि कपूर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ऋषि कपूर यांच्या निधनाने सदाबहार व्यक्तिमत्त्व हरपलं अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (ऋषि कपूर यांच्या निधनावर शरद पवार, राहुल गांधी, प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केला शोक; ट्विटच्या माध्यातून वाहिली श्रद्धांजली)

"ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानं हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार अभिनेता आपण गमावला आहे. सतत आनंदी, उत्साही राहणारं असं त्यांचं चिरतरुण व्यक्तिमत्वं होतं. त्यांच्या अभिनयानं रसिकांना निखळ आनंद दिला. ‘कपूर’ कुटुंबाचा कलेचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. काल इरफान खान यांचं निधन झाल्यानंतर आज ऋषी कपूर यांच्या निधनाची आलेली बातमी, हे खरोखरंच धक्कादायक, वेदना देणारं आहे," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 Ajit Pawar Tweet:

उपमुख्यमंत्री अजित पवार शोक संदेशात म्हणाले की, "ऋषी कपूर हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते, परंतु त्या वेदना त्यांनी रसिकांना जाणवू दिल्या नाहीत. जीवनाच्या अखेरपर्यंत चित्रपटसृष्टीशी आणि रसिकांशी नातं, संपर्क कायम राखलेले ते कलावंत होते. भारतीय चित्रपट जगताच्या इतिहासात त्याचं नाव, त्यांचा अभिनय अजरामर राहील." तसंच त्यांना भावपूर्ण श्रद्धाजंली अर्पण करत अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, असेही म्हटले आहे.