Mumbai: अभिनेता सलमान खान (Salman Khan) च्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात गाझियाबादचे कनेक्शन समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी गाझियाबाद येथून एका 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाने लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) च्या नावाने अभिनेता सलमान खानचे घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट येथून ओला कॅब बुक केली होती. ओला कॅबचा ड्रायव्हर सलमान खानच्या घराबाहेर पोहोचला आणि त्याने तिथल्या गार्डला बुकिंगची माहिती दिली तेव्हा गार्डने लगेच याबाबत पोलिसांना कळवले.
मुंबई पोलिसांनी यासंदर्भात अधिक माहितीचा तपास केला तेव्हा ओला बुक करणारी व्यक्ती गाझियाबादमधील तरुण असल्याचे आढळून आले, त्याचे नाव रोहित त्यागी असून त्याचे वय फक्त 20 वर्षे आहे. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हे फक्त गंमत म्हणून केल्याचे त्याने सांगितले. सध्या न्यायालयाने आरोपी रोहित त्यागीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दोन दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई यांच्या नावावर ओला कार बुक केली होती. (हेही वाचा -Salman Khan House Firing: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन्ही शूटर्संना 10 दिवसांची पोलिस कोठडी)
मिळालेल्या माहितीनुसार, 17 एप्रिल रोजी संध्याकाळी एसआय रणजीत चौहान आपल्या टीमसोबत मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात आले होते. एसीपी कविनगर अभिषेक श्रीवास्तव यांनी सांगितले की, पोलिसांनी केशव कुंज येथील रोहित त्यागी नावाच्या तरुणाला अटक केली आहे. त्याला पकडल्यानंतर टीम जीडीमध्ये दाखल झाली आणि त्याला सोबत घेऊन गेली.
रोहितविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात कलम 505 (2) आणि 290 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला पोलीस कोठडीत पाठवण्यात आले. आरोपीने आपण सलमानचा चाहता असल्याचा दावा केला आणि प्रँकसाठी कॅब बुक करण्यास सांगितले. रोहितने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, तो सलमान खानचा खूप मोठा चाहता आहे. बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांनी ॲप इन्स्टॉल करून कॅब बुक केली. त्याने दोनदा कॅब बुक केली. कॅबचे लोकेशन गॅलेक्सी अपार्टमेंट ते वांद्रे पोलिस स्टेशन होते. जेव्हा ड्रायव्हर तिथे पोहोचला आणि त्याला कोणीच दिसले नाही तेव्हा त्याने रोहितला फोन केला. यावेळी कॅब चालकाला संशय आल्याने त्याने पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांत तक्रार केली, त्यानंतर मुंबई पोलिसांचे पथक गाझियाबादला पोहोचले. रोहितने सांगितले की, लॉरेन्सला धडा शिकवण्यासाठी त्याने ही प्रँक केली होती.