Hyundai Kona बनली जगात सर्वाधिक उंचीवर पोहोचणारी पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही; गिनीज बुकमध्ये नोंद, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Hyundai KONA Electric SUV (Photo Credits: Hyundai)

दक्षिण कोरियाची ऑटोमोबाइल कंपनी ह्युंदाई (Hyundai) ने, आपली ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक एसयूव्ही (Hyundai Kona Electric SUV) भारतीय बाजारपेठेत दाखल केली. आता ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक एसयूव्ही कारचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) मध्ये नोंदवले गेले आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीने 'Highest Altitude Reached By An Electric Vehicle' अंतर्गत खास कामगिरी केली आहे.

कोना इलेक्ट्रिकला तिबेटमधील सावला पास (Sawula Pass) पर्यंत म्हणजेच 5,731 मीटर उंचीपर्यंत चालविली गेली. अशा उंचीवरुन चालविणारी कोना ही पहिली इलेक्ट्रिक कार आहे. भारतात ही कार 39.2 किलोवॅट क्षमतेच्या लिथियम आयन बॅटरीसह सादर झाली होती.

ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार आहे. एकदा संपूर्ण चार्ज झाल्यावर ह्युंदाई कोना 452 किमी धावेल. बाजारात नव नवीन येणार्‍या इलेक्ट्रिक गाड्यांपैकी ही बर्‍यापैकी चांगली श्रेणी आहे. सामान्य चार्जरसह कोना इलेक्ट्रिकला 6 तास 10 मिनिटांत पूर्णपणे चार्ज केले जाऊ शकते. तसेच डीसी फास्ट चार्जरसह 57 मिनिटांत या इलेक्ट्रिक एसयूव्हीवर 80% चार्ज केले जाऊ शकते. इलेक्ट्रिक कार असूनही, कोनाचा वेग कमी नाही. कंपनीचा असा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 9.7 सेकंदात ताशी 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेगवान होऊ शकते. या गाडीचा उच्च वेग ताशी 200 किलोमीटर आहे. (हेही वाचा: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये)

लेदर सीट्स, स्टीयरिंग व्हीलवर लेदर फिनिश आणि डॅशबोर्डवरील सॉफ्ट टच त्याच्या केबिनला प्रीमियम अनुभव देते. या गाडीत 10-वे पॉवर अडजेस्टेबल ड्रायव्हर सीट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, चार्ज मॅनेजमेन्ट, व्हेंटिलेटेड आणि हीटेड फ्रंट सीट्स, व्हॉईस रिकग्निशन, बटन टाइप शिफ्ट-बाय-वायर तंत्रज्ञान, पॅडल शिफ्टर्स, युटिलिटी मोड आणि अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्ले आहेत. 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सारखी वैशिष्ट्येदेखील समाविष्ट आहेत.

ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक एसयूव्ही जुलै 2019 मध्ये लाँच करण्यात आली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कोना एसयूव्हीची -30 डिग्री तापमानात चाचणी घेण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस जगभरात कोनाच्या 46,000 पेक्षा जास्त युनिट्स विकले जातील अशी कंपनीची अपेक्षा आहे. या गाडीची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत 23.71 लाख ते 23.9 लाख रुपयांदरम्यान आहे. कंपनी कोना बॅटरीवर 8 वर्षाची वॉरंटी देत आहे.