
गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीवर थोडा फार विजय मिळवून, आता कुठे जग पुन्हा एकदा मोकळेपणाने श्वास घेत होते. अशात बातमी आहे की, चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे आणि याचे कारण डेल्टा व्हेरिएंट असल्याचे सांगितले जात आहे. चीनचे अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, गेल्या एका आठवड्यात चीनच्या 11 प्रांतांमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरला आहे. चीनचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी म्हणतात की, डेल्टा व्हेरिएंटचे हे प्रकरण बाहेरून आले आहे.
चीनमधील काही साथीरोग तज्ञांचा असा विश्वास आहे की 2020 मध्ये वुहानमध्ये पसरलेल्या संसर्गानंतर हा सर्वात धोकादायक संसर्ग असू शकतो. या संसर्गामुळे पुन्हा एकदा चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकंडाऊन लागू करण्यात आले आहे. देशातील शाळा बंद आहेत तसेच अनेक विमाने उड्डाणेही रद्द करण्यात आले चीनच्याअ इनर मंगोलिया प्रदेशातील आयजिन काउंटीमध्ये प्रशासनाने सर्व 35,700 नागरिकांना घरामध्येच राहण्याचे आदेश दिले आहेत. कोणी नियम न पाळल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
मंगोलियाच्या सीमेला लागून असलेला हा चिनी भाग सध्या देशात कोरोनाच्या नवीन उद्रेकाचे हॉटस्पॉट आहे. गेल्या एका आठवड्यात नोंदवलेल्या 150 प्रकरणांपैकी एक तृतीयांश प्रकरणे या भागातील आहेत. (हेही वाचा: शेकडो विमान उड्डाणे अचानक रद्द, शाळा पुन्हा बंद; जाणून घ्या चीनवर पुन्हा लॉकडाऊनची वेळ का आली)
आतापर्यंत चीनमध्ये देशांतर्गत पातळीवर कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यात यश आले होते, मात्र आता सलग पाचव्या दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आल्याने देशाची चिंता वाढली आहे. यापैकी बहुतेक प्रकरणे देशातील उत्तर आणि वायव्य प्रांतांतून नोंदवली गेली आहेत. सरकारने या भागात निर्बंध कडक केले आहेत. पर्यटकांच्या गटाचा भाग असलेल्या एका वृद्ध जोडप्याला नवीन प्रकरणांसाठी दोषी ठरवले जात आहे. एक दिवस आधी, देशाच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने इशारा दिला होता की हा उद्रेक आणखी गंभीर रूप धारण करू शकतो.