Team India (Photo Credit - Twitter)

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले. त्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टेस्ट सहज जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरेल असं वाटत होतं, पण इंदूर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं दमदार पुनरागमन करत 9 विकेट्सनं विजय मिळवला आणि टीम इंडियाला WTC च्या फायनलमध्ये पोहोचण्यास अजुन वाट पाहावी लागार आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे, ज्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर ती डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल, परंतु सामना हरला आणि अनिर्णित राहिला तर समीकरण वेगळे होऊ शकते. (हे देखील वाचा: IND vs AUS 4th Test: शेवटच्या कसोटीपूर्वी रोहित शर्माने मीडियाशी साधला संवाद, म्हणाला- 'ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमुळे संघाला होतोय त्रास')

काय आहे समीकरण

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला तर टीम इंडिया बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 ने जिंकेल. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांना श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर अवलंबून राहावे लागेल. दुसरीकडे, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी श्रीलंकेला न्यूझीलंडच्या भूमीवर दोन कसोटी सामन्यांची मालिका जिंकावी लागेल. पराभव किंवा अनिर्णित त्याचे WTC च्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न संपुष्टात येऊ शकते. अशा स्थितीत भारत दुसऱ्या स्थानावर राहून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी सहज पात्र ठरेल.

श्रीलंकेसाठी आहे अवघड रस्ता

न्यूझीलंडच्या खेळपट्ट्या नेहमीच वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरल्या आहेत. आशियाई देशाला तिथे दोन कसोटी जिंकणे फार कठीण आहे. त्याचबरोबर श्रीलंकेचा संघही आपल्या जुन्या लयीत दिसत नाही. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात पराभव आणि अनिर्णित राहिल्यानंतरही टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे दरवाजे बंद होणार नाहीत.