Uddhav Thackeray Resigns: उद्धव ठाकरे यांनी दिला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा; शरद पवार, सोनिया गांधी यांचे मानले आभार
Photo Credit: Twitter

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा तसेच विधान परिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात राजकीय गदारोळ माजला आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात होती. गेले अनेक दिवस यावर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह बंड केलेल्या आमदारांनी शिवसेनेने महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे असा प्रस्ताव ठेवला, मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून तशी चिन्हे दिसली नाहीत. अशात आता उद्या राज्यपालांनी दिलेल्या आदेशावरून विधानसभेमध्ये बहुमत चाचणी होणार आहे. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.

सोशल मिडीयावर केलेल्या निवेदनामध्ये त्यांनी आपण आपल्या पदाचा त्याग करत असल्याचे सांगितले. त्यांनी सुरुवातीला सरकारने घेतलेले महत्वाचे निर्णय नमूद केले. तसेच राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने अध्यक्ष शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी बंडखोर आमदारांच्याबाबत भाष्य केले. शिवसेना प्रमुखांनी ज्यांना मोठे केले त्यांनी बंड केले याचे दुःख होते, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, बंडखोर आमदारांची जी काही नाराजी आहे ती त्यांनी माझ्यासमोर येऊन बोलावे. एक कुटुंब म्हणून आपण यावर चर्चा केली असती, मार्ग काढला असता.’

शेवटी ते म्हणाले, 'मला मुख्यमंत्री पद जाण्याची खंत नाही. मी अनपेक्षित पद्धतीने (सत्तेवर) आलो होतो आणि त्याच पद्धतीने मी बाहेर पडत आहे. मी कायमचा दूर जाणार नाही, इथेच राहणार आणि पुन्हा एकदा शिवसेना भवनात बसेन. मी माझ्या सर्व लोकांना पुन्हा एकत्र करेन. पुन्हा एकदा भरारी मारणार आहे. आता उद्या ज्यांनी शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचले, शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले त्यांना नव्या सरकारचे पेढे खाऊ दे.' (हेही वाचा: औरंगाबादचे 'संभाजी नगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' असे नामकरण करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाची मंजुरी)

दरम्यान,  2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात मोदी लाट असतानाही उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे 63 आमदार निवडून आणले होते. मात्र त्यांनतर मुख्यमंत्री पदावरून झालेल्या वादानंतर भाजप आणि शिवसेनेमधील युती तुटली. पुढे शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती करून महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. उद्धव ठाकरे यांचा 27 नोव्हेंबर 2019 दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये भव्य शपथविधी सोहळा पार पडला होता. उद्धव ठाकरेंना विधानपरिषदेच्या माध्यमातून आमदारकी देण्यात आली होती.