Udayanraje Bhosale | (Photo Credits: ANI)

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यांसाठी सामान्य नागरिकांसह अनेक राजकीय नेते देखील पुढे सरसावले आहेत. यातच भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी एबीपी माझाशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत असताना एक मोठे वक्तव्य केले आहे. "मी कधी राजकारण करत नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच," असे त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. मराठा आरक्षणाबाबत एक ठोस निर्णय व्हावा, अशी इच्छा त्यांनी केली.

एबीपी माझाशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना उदयनराजे म्हणाले, "मराठा आरक्षणावर सरकारने काही केलं तर ठीक, नाहीतर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार. मी मनापासून बोलतो, मी कधी राजकारण केलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच. फक्त मराठा समाजासाठीच नाही इतर कोणावर अन्याय होत असतील तर त्यांच्यासाठीही लढणार. कोणावर अन्याय झाला आणि वेळ आली तर राजीनामा देणार. काय होत नसेल तर पदावर राहून काय उपयोग?"

हेदेखील वाचा- Sharad Pawar On SC stay On Maratha Reservation: मराठा आरक्षण स्थगितीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया - राज्य सरकारकडे अध्यादेश काढत विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याचा पर्याय, इतर कायदेशीर मार्गांचा देखील विचार होऊ शकतो

त्याचबरोबर इतर समाजाप्रती मला आदर आहे. मात्र प्रत्येकाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. न्यायालयाने सर्वांना समान अधिकार द्यावेत. न्याय मिळाला नाही तर उद्रेक होणार हे स्वाभाविक आहे असेही ते म्हणाले.

"सध्या लोकशाही आहे. राजेशाही असती तर दाखवलं असतं. माझं एकच म्हणणं आहे. अन्याय होत असेल तर लोकशाहीच्या राजांनी राजासारखं वागायला हवं. लोकांच्या माध्यमातून तुम्ही निवडून जाता, तेवढं भान ठेवलं पाहिजे आणि प्रत्येकाला न्याय दिला पाहिजे. नाहीतर आणा राजेशाही, मग मी दाखवतो, काय करायचं, काय नाही, असे देखील उदयनराजे यावेळी म्हणाले.