Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गामुळे दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत चालली आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स आणि औषधांच्या कमतरतेमुळे राज्यात लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु मंगळवारी सरकारने ही शक्यता नाकारली. आणीबाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले की, राज्यात लॉकडाउन लागू केले जाणार नाही परंतु काही निर्बंध लादले जातील. दुसरीकडे टोपे यांनी सांगितले की, महाराष्ट्रामध्ये पुरेसे रेमडेसिविर (Remdesivir) आहे, मात्र त्याचे वितरण करणे हे आव्हान आहे. म्हणून त्यांनी डॉक्टरांना ऑक्सिजन आणि रेमडेसिविर योग्यप्रकारे वापरण्याचे आवाहन केले आहे.

पुढे त्यांनी राज्यातील ऑक्सिजन उपलब्धतेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात सध्या 1250 टन द्रव ऑक्सिजन तयार होत आहे, तो 100% वैद्यकीय कारणासाठी वापरला जाईल.’ ते पुढे म्हणाले, ‘आमची अशी अपेक्षा आहे की सध्या राज्यात असलेल्या एकूण सक्रीय रुग्णांपैकी फक्त 15 टक्केच रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासू शकते. आत्तापर्यंत राज्यात आपल्याकडे 1550 मे.टन ऑक्सिजनची व्यवस्था आहे. आम्ही तेच वितरीत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसेच भारत सरकारही ऑक्सिजनची आयात करेल व त्याचाही राज्याला पुरवठा होईल याची आम्ही अपेक्षा करीत आहोत.’

यासह, देशात कोरोना विषाणू लसीकरणाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने, राज्य सरकारांना थेट लस उत्पादकांकडून लस घेण्याची परवानगी दिली आहे. आता महाराष्ट्र सरकार इतर देशांकडून लसींची आयात करणार आहे. तसेच ब्रिटनच्या धर्तीवर रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्याकरिता, सर्व विभागांकडून निधी वळविला जाणार आहे. राज्य सरकारने मंगळवारी याबाबत माहिती दिली. स्पुतनिक-व्ही, फायझर आणि मॉडर्ना अशा परदेशात तयार केलेल्या लस उपलब्ध असल्यास राज्य सरकार त्यादेखील घेण्याचा प्रयत्न करणार आहे. (हेही वाचा: Thane: रेमडेसिवीरच्या काळा बाजार प्रकरणी मीरा रोड येथून 3 जणांना अटक)

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटामध्ये महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. इथल्या डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकी लीक झाली आहे. या अपघातात 22 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी 12 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.