Piyush Goyal (Photo Credits: Wiki Commons)

रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Railway Minister Piyush Goyal) यांच्या मुंबईतील घरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोराने घरातील मूल्यवान वस्तूंसह काही महत्त्वाची कागदपत्रेही लंपास केल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून हा आरोपी त्यांच्या घरात काम करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

ही घटना 16 ते 18 सप्टेंबरदरम्यान घडल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोराने चांदी आणि अन्य धातूंच्या वस्तू लंपास केल्या असून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये रेल्वे आणि अर्थ मंत्रालयाशी निगडित महत्त्वाची माहिती सापडली आहे. तसंच त्या व्यक्तीने अन्य तीन जणांच्या इमेलवर ही माहिती पाठवल्याचं तपासादरम्यान समोर आलं आहे. सदर व्यक्ती अन्य व्यक्तींपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवत असल्याची शंका पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा-पीयूष गोयल पुराना VIDEO हुआ VIRAL ने कहा रोज सुबह बोलता हूं- ‘’ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह’’

विष्णु कुमार विश्वकर्मा असं या अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो गेल्या तीन वर्षांपासून गोयल यांच्या मुंबईतील निवासस्थानी काम करत होता. सध्या त्याचा जप्त करण्यात आलेला मोबाईल सायबर सेलकडे पाठवण्यात आला असून त्यानं डिलिट केलेल्या इमेलचीही रिकव्हरी करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच या गंभीर गुन्ह्यात त्याला साथ देणाऱ्या व्यक्तींचाही पोलीस शोध घेत आहेत. आरोपीने पाठवलेल्या महत्त्वाच्या ईमेल्सची कसून चौकशी सुरु आहे.