नितेश राणे यांच्यासह 18 जणांना पोलीस कोठडी; सरकारी अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी न्यायालयाचे आदेश
नितेश राणे यांना अटक (Photo Credit : Twitter)

कॉंग्रेस आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत एका अधिकाऱ्याला चिखलाने अंघोळ घालण्याचे धक्कादायक कृत्य केले होते. याब्बदल अनेक प्रतिक्रिया उमटल्यावर नितेश नारायण राणे यांनी कणकवली पोलिसांसमोर (Kankavali Police) आत्मसमर्पण केले होते. आज दुपारी साधारण तीन वाजता नितेश राणे यांना कणकवली न्यालायासमोर हजर करण्यात आले. राणे यांना हे कृत्य चांगलेच महागात पडले आहे. कारण न्यायालयाने त्यांना 9 जुलै पर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे.

काल दुपारी पोलिसांनी नितेश यांना अटक केली. आयपीसी कलम 353, 342, 332, 324, 323, 120 (ए), 147, 143, 504, 506 अंतर्गत त्यांच्याविरुद्ध आणि त्यांच्या 40-50 समर्थकांविरुद्ध एफआयआरची नोंद करण्यात आली आहे. आज याबाबत न्यायालायात युक्तिवाद पार पडला. दोन्ही बाजू ऐकल्यावर न्यायालयाने राणे यांच्यासह 19 जणांना पोलीस कोठडी बजावली आहे. आता 9 जुलै पर्यंत नितेश राणे जेलमध्ये असणार आहेत. कोर्टाने त्यांचा जमीनही नामंजूर केला आहे. (हेही वाचा: रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत नितेश राणे आक्रमक; अधिकाऱ्याला चोप देत घातली चिखलाची अंघोळ (Video))

अटक केल्यावर अचानक नितेश राणे यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. त्यांना जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले होते, त्यानंतर या प्रकरणाबाबत कोर्टाचे काम सुरु झाले. राणे यांना अटक झाल्यामुळे आज संपूर्ण कणकवली बंद होती. यावेळी नितेश यांनी पोलिसांवर अरेरावी करत ‘कणकवली तुम्हाला बघून घेईल’ अशा धमक्याही दिल्या. याबाबत बोलताना नारायण राणे यांनी, ‘हे वर्तन पूर्णतः चुकीचे आहे. महामार्गाच्या मुद्द्यावर निषेध नोंदवणे योग्य आहे, परंतु नितेश आणि त्यांच्या समर्थकांद्वारे अशाप्रकारे हिंसा घडणे योग्य नाही. मी या गोष्टीचे समर्थन करत नाही,’ असे मत व्यक्त केले आहे.

दरम्यान मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम चालू असल्याने ट्राफिक वाढले आहे. त्यात निर्माण झालेले खड्डे बुजवण्यात प्रशासन टाळाटाळ करत आहे. याच मुद्द्यावर कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे आक्रमक झाले होते. त्यांनी याबाबत थेट आंदोलन करत, हायवे प्रकल्पाचे उप-अभियंता प्रकाश शेडेकर यांना चक्क चिखलाने अंघोळ घातली. यावेळी अभियंत्याला शिवीगाळ करत त्याला बांधून ठेवण्यात आले होते.