गुरुवारी संध्याकाळी माहीमच्या पी.डी.हिंदुजा हॉस्पिटलमध्ये (Hinduja Hospital) दाखल झालेल्या रुग्णाची, कोरोना व्हायरसची (Corona Virus) चाचणी पॉझिटिव्ह झाल्यानंतर शुक्रवारी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात लोकांना वेगळे ठेवण्याचे काम करण्यात आले. शहरातील कोरोना व्हायरस संबंधित घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी, नोडल अधिकारी म्हणून नेमलेल्या महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. सध्या कोरोना व्हायरसचा जास्त धोका असलेल्या रुग्णांना वेगळे ठेवण्यात आले असून, ते निरीक्षणाखाली आहेत. दुसरीकडे ज्यांना कमी धोका आहेत अशा लोकांना घरी सोडण्यात आले असून त्यांना घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे.
यामध्ये रुग्णांच्या थेट उपचारामध्ये जे सामील होतात, असे डॉक्टर आणि सहाय्यक कर्मचारी यांना कोरोना व्हायरसचा जास्त धोका आहे. तर जास्त धोका असलेल्या लोकांच्या सानिध्यात जे येतात त्यांना या विषाणूचा कमी धोका आहे. अशाप्रकारे रूग्णाच्या उपचारात गुंतलेल्या किमान दोन परिचारिकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. कर्मचारी आणि भेटायला येणाऱ्या कमी जोखमीच्या श्रेणीतील 85 पेक्षा जास्त लोकांना, घरीच वेगळे ठेवण्यात आले आहे.
दुबईहून शहरात परत आलेल्या 64 वर्षीय व्यक्तीला 8 मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी त्याची कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला कस्तुरबा गांधी रुग्णालयात हलविण्यात आले. बुधवारी, महापालिकेने आणखी दोन सकारात्मक घटनांची पुष्टी केली, यामध्ये 69 आणि 70 वयाच्या दोन व्यक्तींचा समावेश आहे. हे दोघेही याच महिन्यात दुबईहून आले होते. त्यांनाही कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा: अहमदनगर व मुंबई येथे आढळला कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण; Corona Virus मुळे दिल्लीतील 68 वर्षीय महिलेचा मृत्यू)
हिंदुजा रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व खबरदारीच्या उपाययोजना करूनही, रुग्णालयात दाखल केलेल्या रूग्णांपैकी एकाची कोरोना व्हायरस चाचणी सकारात्मक आली आहे. सध्या रुग्णालय एमसीजीएमच्या पथकाच्या सल्ल्याचे पालन करीत आहे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार सर्व प्रोटोकॉल कार्यान्वित केले गेले आहेत.