
कोरोना संसर्गाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता यावर्षी इयत्ता दहावीची (SSC Exam) परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तर, राज्य मंडळाची इयत्ता बारावीची (HSC Exam) परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. परंतु, दहावीची परीक्षा रद्द केल्यावरुन मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरू असताना मुंबई उच्च न्यायालयाने कालच राज्य सरकारला फटकारले आहे. याचपार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा सदंर्भातील निर्णय येत्या 2 दिवसांत घेतला जाणार आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात उद्धव ठाकरे नेमकी काय भुमिका घेतात? याकडे विद्यार्थ्यांसह पालकवर्गांचेही लक्ष लागले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दहावी आणि बारावीच्या परिक्षेसंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, बुधवारी मंत्रिमंडाळाची बैठक पार पडली. त्यावेळी या विषयावरही चर्चा झाली. येत्या एक-दोन दिवसांत संबंधित खात्याचे मंत्री, सचिन यांना अहवाल तयार करण्यात सांगितला आहे. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Asaram Bapu: आसाराम बापू याचा मुक्कम तुरुंगातच! बरे होताच कारागृहात हजर करण्याचे कोर्टाचे आदेश, जामीन याचिकाही फेटाळली
तसेच, दहावीच्या परिक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना गुण कसे द्यावे याच्या संदर्भातील निर्णय सोमवारी शिक्षणमंत्री घेणार असून राज्य सरकारच्या वतीने नियमावली सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना थेट गुणपत्रिका मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
इयत्ता दहावीची यंदाची परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला पुण्यातील धनंजय कुलकर्णी यांनी जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. "एसएससी, आयसीएसई, सीबीएसई अशा वेगवेगळ्या बोर्डांनी विद्यार्थ्यांचे दहावीचे निकाल वेगवेगळ्या सूत्रांनी लावले तर, आणखी गोंधळ वाढेल. पदविकांच्या विविध कोर्सच्या प्रवेशातही गोंधळ होईल. एसएससी बोर्डाने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटीची घोषणा केली आहे. मग इयत्ता दहावीची परीक्षा घेणेही शक्य आहे. याप्रश्नी न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशा विनंती याचिकेत करण्यात आल्याचे अॅड. उदय वारुंजीकर यांनी सांगितले होते.