![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/12/dfg-380x214.jpg)
सोमय्या कॉलेजच्या (Somaiya College) एका 22 वर्षीय मुलाचा रस्सीखेच खेळताना जागेवरच अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमय्या कॉलेजचा विद्यार्थी जीबीन सनी हा कॉलेजच्या स्पोर्ट्स डे मध्ये सहभागी झाला होता. रस्सी खेच (Tug of War) खेळताना सर्वात पुढे असलेल्या सनीने पुर्ण ताकदीनिशी रस्सी खेचली. या प्रयत्नामध्येच तो अचानक खाली कोसळला. जीबीन सनी हा नर्सिंग शाखेचा विद्यार्थी होता.
रस्सी खेच खेळ जिंकण्याच्या नादामध्ये जीबीन सनी या मुलाने दोर मानेपर्यंत वर खेचला. यामध्येच एका बाजूला अधिक भार आल्याने तो खाली कोसळला. कॉलेजच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला राजावाडी रूग्णालयामध्ये नेले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. जीबीन सनी याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याच कारण अजून समजू शकलेले नाही.
जीबीन हा ठाण्याच्या वागळे इस्टेट येथे राहणारा होता. कॉलेजच्या स्पोर्ट्स डेमध्ये सहभागी झाल्यानंतर अशाप्रकारे अकाली विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने सोमय्या कॉलेज आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे. या घटनेबाबत टिळक नगर पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आलेली असून स्थानिक पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.