Nawab Malik (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रामध्ये 20 ऑगस्टपासून ‘सामाजिक ऐक्य पंधरवडा’ (Social Unity Fortnight) साजरा होणार आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचा 20 ऑगस्ट हा जयंती दिवस दरवर्षी सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने राज्यात 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2020 या कालावधीत सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्याचे शासनाने ठरविले आहे. राज्यातील विविध भागातील विविध धर्मांच्या व विविध भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकाविषयी ऐक्याची भावना, सौहार्दभाव वृध्दीगंत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दिष्टे हा पंधरवडा साजरा करण्यामागे आहेत, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

सद्भावना दिवस व सद्भावना पंधरवडा हा कोरोना विषाणुच्या संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेता, केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार साजरा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रालयाच्या प्रांगणात सामाजिक अंतराचे पालन करून 20 ऑगस्ट रोजी सद्भावना दिवस साजरा करण्यात येणार असून, उपस्थिताना सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा देण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातून ऑनलाईन किंवा लाऊड स्पिकरमार्फत सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम आयोजित करावा, तसेच अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहाता यावा यासाठी वेबसाईटव्दारे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: खासदार संजय राऊत यांचा राजीनामा घ्या, ठाण्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र)

सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मुख्यालयात सामाजिक ऐक्याचा संदेश प्रसृत करण्यासाठी ऑनलाईन वेबिनार इत्यादीव्दारा संवाद, मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करावेत. या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांना भाषण देण्यासाठी निमंत्रित करावे. बृहन्मुंबईत लोकांच्या विशेषत: युवकांच्या सहभागाने सांस्कृतिक कार्य संचालक यांनी सद्भावना विषयावर ऑनलाईन वेबिनार इत्यादीव्दारा संवाद, मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करावा. यंदा सद्भावना शर्यतसारखे उपक्रम आयोजित करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.