Shiv Sena Manifesto 2019: विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा 'वचननामा' जाहीर; सत्तेत आल्यावर देणार 10 रुपयात थाळी, 1 रु. मध्ये आरोग्य तपासणी
शिवसेना वचननाम प्रसिद्ध (Photo Credit : Twitter)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2019 (Maharashtra Assembly Eections 2019) साठी शिवसेनेने आपला वचननामा (Shivsena Manifesto) जाहीर केला आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणुका लढवत आहेत, परंतु जाहीरनाम्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाले नसल्यामुळे शिवसेनेने आपल्या पक्षाचा स्वतंत्र वचननामा जारी करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि पक्षाचे उपनेते प्रियंका चतुर्वेदी यांनी संयुक्तपणे हा वचननामा जनतेसमोर मांडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरे कॉलनीत नुकत्याच झालेल्या वृक्षतोडीच्या मुद्दय़ासह भाजप आणि शिवसेना यांच्यात अनेक मुद्द्यांवर सहमती झाली नाही.

21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. यासाठी राज्यातील तमाम पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यानातर आता शिवसेनचा वचननामा समोर आला आहे. राज्यात पुन्हा सत्तेत आल्यानंतर शिवसेना पक्ष काय काय करणार आहे हे या वचननाम्यात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये 10 रुपयांमध्ये मिळणाऱ्या जेवणापासून ते 1 रुपयांमध्ये चेकअप अशा गोष्टींचा समाविष्ट आहेत.

वचननाम्यातील महत्वाच्या गोष्टी -  

> शिवसेना राज्यात पुन्हा एकदा सत्तेत आल्यावर 10 रुपयांत जेवण उपलब्ध करून देणार आहे. महत्वाचे म्हणजे या कामासाठी महिला बचत गटांतील महिलांना सामावून घेतले जाणार आहे.

> घरगुती वापरातील वीजेसाठी 300 युनिटपर्यंत 30 टक्के सूट देणार

> 200 प्राथमिक आरोग्य चाचण्या एक रुपयामध्ये उपलब्ध करून देणार

> अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक वर्षाला 10, 000 रुपये जमा करणार

> प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयासह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार

यासोबत या वचननाम्यात ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विशेष बसेसची सोय, खतांचे दर स्थिर राहण्यासाठी योजना, मुख्यमंत्री शहर सडक योजना, पीकविमा योजनेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची सोय, 15 लाख पदवीधर युवकांना 'युवा सरकार फेले अंतर्गत शिष्यवृत्तीची संधी, मुंबईच्या वचननाम्यात आरेचा उल्लेख जंगल असा करणार, तिर्थक्षेत्र प्रवासासाठी समन्वयक केंद्रांची स्थापना अशा आश्वासनांचा समावेश आहे.

यावेळी बोलताना, राज्याच्या तिजोरीचा विचार करून हा वचननामा आम्ही बनवलेला आहे, पूर्णपणे जबाबदारीने हा वचननामा आखलेला आहे. यातले एकही वचन खोटे ठरणारं नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.