शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री; जाणून घ्या 'मातोश्री' ते 'वर्षा'पर्यंतचा त्यांचा प्रवास
उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे (संग्रहित संपादित प्रतिमा)

नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीने (MahavikasAghadi) महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर शिवसैनिकांमध्ये एकप्रकारचा उत्साह संचारला. आता येत्या गुरुवारी म्हणजे 28 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. अशाप्रकारे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे. या घोषनेनंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला वंदन करून आशीर्वाद घेतले. ज्या मातोश्रीवरून शिवसेनचा कारभार चालायचा, त्या मातोश्रीवरून आता महाराष्ट्राचा कारभार चालणार आहे. मात्र उद्धव ठाकरे यांचा पत्ता बदलण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांचे प्रस्थान वर्षा बंगल्यावर होईल.

1995 ते 1999 या कालावधीमध्ये जेव्हा राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार होते त्यावेळी बाळासाहेबांनी मातोश्रीवरूनच आपल्या रिमोट कंट्रोलने सरकार चालवले. आतापर्यंत मातोश्री हा बंगला अनेक राजकीय खलबतांचा, घटनांचा साक्षीदार राहिला आहे. त्यानंतर आता वीस वर्षांनंतर त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे, मलबार हिल येथील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य निवास ‘वर्षा’ बंगल्यावरून आपल्या पुढील कारकिर्दीची सुरुवात करणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी ‘वर्षा’ हे खास मुख्यमंत्री निवास आहे. ठाकरे घराण्यातील कुणीच संसदीय पद न भूषवल्याने त्यांच्यावर सरकारी निवासस्थानी राहण्याची वेळ आली नव्हती. त्यामुळे आता शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या नव्या सरकारसाठी वर्षा बंगला हा आकर्षणाचा विषय ठरणार आहे. (हेही वाचा: मुख्यमंत्री म्हणून नावाची घोषणा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचे मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला वंदन)

त्याचसोबत आता मंत्रालायातून एका फोटोग्राफरपासून राजकारणी बनलेले उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या सत्तेचा कारभार चालवतील. 1966 मध्ये शिवसेनेच्या स्थापनेनंतर तब्बल 53 वर्षानंतर ठाकरे कुटुंबाचा सदस्य मुख्यमंत्री बनत आहे. महत्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे यांचा मोठा मुलगा आदित्य ठाकरे हा वरळी मतदारसंघातील आमदार आहे. अशाप्रकारे एका रिमोट कंट्रोलपासूनचा हा थेट कंट्रोलपर्यंतचा प्रवास अत्यंत बदल घडवणारा आहे. मात्र उद्धव ठाकरे राहण्यासाठी 'वर्षा'ची निवड करतात का 'मातोश्री'लाचा पसंती देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, या सत्ता स्थापनेनंतर भाजप विरोधी बाकावर बसत असल्याने महाविकास आघाडीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. मात्र या नव्या युतीला शरद पवार सारख्या मातब्बर, मुरलेल्या राजकारण्याची साथ असल्याने पुढील 5 वर्षे निभावून नेता येतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.