Sanjay Raut | Photo Credits: Twitter/ ANI

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि करीम लाला (Karim Lala)  यांच्या भेटीबद्दलच्या शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विधानानंतर कालपासून महाराष्ट्रात चर्चांना उलट सुलट उधाण आलं आहे. दरम्यान आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी उठल्या, त्यामुळे या वक्तव्यावर काँग्रेसकडून तीव्र नाराजी व्यक्त झाली. आज (16 जानेवारी) वाढता दबाव आणि चौफेर टीका पाहता संजय राऊत यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे विधान घेतो अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना देत या वादावर पडदा टाकला आहे. 'काँग्रेस' चा अंडरवर्ल्ड सोबत संबंध यापेक्षा बदनामीकारक काय? पक्षाने खुलासा करावा देवेंद्र फडणवीस यांची मागणी.

महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील संजय राऊत यांनी विधान मागे घेतलं असून यापुढे कुणीही अशाप्रकारे वक्तव्य करताना काळजी घ्यावी असा सल्ला दिला आहे. तसेच संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी कळवली होती. मात्र आता या वादावर पडदा पडल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

'इंदिरा गांधी यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. मी नेमकं काय बोललो आणि कशासंदर्भात बोललो हे समजून घ्या. विनाकारण राजकारण करू नका,' असं स्पष्टीकरण देणारे ट्वीटस त्यांनी सकाळी केले आहेत. त्यानंतरही कॉंग्रेस पक्षाकडून संजय राऊत यांनी इंदिरा गांधींच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत वक्तव्य मागे घ्यावं अशी मागणी केली होती.

दरम्यान सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे हा वाद फार न खेचता त्यावर पडदा टाकत संजय राऊत यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे.