Mayur Shelke | (Photo Credits: Facebook)

वांगणी रेल्वे स्थानकात (Vangani Railway Station) चिमुकल्याचा जीव वाचवणारे पॉईंटमन मयुर शेळके (Mayur Shelke) यांनी त्यांच्या एका कृतीने लाखो लोकांची मने जिंकली. ते सुपरहिरो ठरले. रेल्वे मंत्र्यांपासून सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता माणुसकीला प्रेरणा देणाऱ्या मयुर शेळके यांच्या कार्यासाठी रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) त्यांना 50  हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. रेल्वे मंत्रालयाने ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. (Vangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव)

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पाईंटमन मयुर शेळके यांच्या शौर्य, धैर्य आणि प्रसंगावधान यासाठी 50,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्यांनी रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या चिमुकल्याचा जीव वाचवला आहे, असे रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यासोबत त्या थरारक प्रसंगाचा व्हिडिओ शेअर करत मयुर यांना सलाम ठोकला आहे.

Ministry of Railways Tweet:

 

मध्य रेल्वेवरील वांगणी स्थानकात शनिवार, 17 एप्रिल रोजी एक सहा वर्षांचा मुलगा आपल्या अंध आईसोबत प्लॅटफॉर्मवरुन चालत होता. चालताना तो ट्रॅकवर पडला. त्याचवेळी उदयन एक्स्प्रेस येत होती. अंध आई मुलगा नेमका कुठे पडला हे चाचपडत होती. तर मुलगा उठून प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी पाईंटमन मयुर शेळके यांनी जीवाची पर्वा न करता रेल्वे ट्रॅकवर धाव घेतली आणि मुलाला प्लॅटफॉर्मवर ठेवले. त्यानंतर स्वत: देखील क्षणार्थात प्लॅटफॉर्मवर चढले. हा थरारक प्रसंग तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ अल्पावधीतच व्हायरल झाला. व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाने मयुर यांचे भरभरुन कौतुक केले आहे.